पंतप्रधान मोदी ४९७ दिवसांनंतर परदेश दौऱ्यावर; बांगलादेशसाठी रवाना
![Prime Minister Modi on foreign tour after 497 days; Departed for Bangladesh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/modi-pm.jpg)
नवी दिल्ली – जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रांतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील ४९७ दिवसांपासून एकही परदेश दौरा केला नव्हता. यापूर्वी मोदींनी नोव्हेंबर २०१९ मध्ये ब्राझीलचा दौरा केला होता. त्यानंतर आज पहिल्यांदाच ते परदेश दौऱ्यावर गेले आहेत. मोदी आज बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी ढाक्याला रवाना झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सुवर्ण जयंती समारंभात सहभागी होणार आहेत. तसेच बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यातही ते आज सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ आणि २७ मार्चच्या आपल्या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन यांनी सामंजस्य करारांची संख्या कमी जास्त होऊ शकते पण किमान पाच करारांवर स्वाक्षऱ्या होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
मागील वर्षी मोदींनी जगभरातील वेगवेगळ्या संस्थांच्या आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. मात्र कोरोनाच्या साथीनंतर हा त्यांचा पहिलाच प्रदेश दौरा आहे. आपला पहिलाचा परदेश दौरा हा मित्र राष्ट्रात असल्याबद्दल मोदींनी समाधान व्यक्त केले आहे. ‘कोरोनानंतरचा हा पहिलाच दौरा एका अशा मित्रराष्ट्रामध्ये आहे ज्याच्याशी भारताचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत’, असे म्हणत मोदींनी या दौऱ्याकडून बऱ्याच अपेक्षा असल्याचे संकेत दिले आहेत. ‘शेजाऱ्यांना प्रथम प्राधान्य या भारताच्या धोरणामध्ये बांगलादेश महत्त्वाचा आहे’, असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशमधील मंदिरांमध्येही जाणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. ५१ शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या प्राचीन जशोरेश्वरी काली मंदिरामध्ये देवी कालीची पूजा करण्यासाठी मोदी मंदिरात जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.