सत्ता थेट डोक्यात शिरली, ‘केजरी’ची ग्रहदशा फिरली!
![Power, directly, in the head, entered, 'kejri', planetary dasa, rotated,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/arvinda-780x470.jpg)
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणेच लागले. भारतीय जनता पार्टी घवघवीत यश घेऊन सत्तेवर आली. केजरीवाल यांची हॅटट्रिक हुकली, तर काँग्रेस पक्षाला सलग तिसऱ्या निवडणुकीत भोपळा फोडता आला नाही !
झुंजार, स्पष्टवक्ते, अहंकारी केजरीवाल
एक झुंजार, स्पष्टवक्ता आणि कर्तव्यतत्पर परंतु अहंकारी असा समाजसेवक दिल्लीकरांनी बारा वर्षांपूर्वी निवडला आणि त्याच्या पाठीशी ते ठाम उभे राहिले. हाच समाजसेवक म्हणजे केजरीवाल ! त्याच सुमारास नरेंद्र मोदी देखील पंतप्रधानपदी विराजमान झाले. भारताचे राजकारण बदलणार, त्याचप्रमाणे दिल्लीचेही बदलणार आणि विकासकामांचा धुमधडाका सुरू होणार, अशी भारतीयांची इच्छा होती. पण, केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारचे आणि मोदी यांच्या केंद्र सरकारचे कधीही पटले नाही. दोघांच्या मधून विस्तवही जात नाही, ते जनतेने पाहिले.
दिल्लीमध्ये काहीतरी विचित्र घडू लागले. केजरीवाल यांची पावले वेगळ्या पद्धतीने पडू लागली. पण त्यानंतरही दिल्लीकरांनी त्यांना सत्तेवर बसवले. केजरीवाल शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात तसेच पाणीपुरवठा आणि रस्ते या मुद्द्यावर क्रांती करताना दिसत होते. पहिल्या दोन वेळा केजरीवाल यांना प्रचंड बहुमत मिळाले, 70 पैकी तब्बल 67 सीट त्यांनी जिंकल्या, आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झाले !
..पण, नियतीच्या नेमके मनात काय ?
यशाची एक एक शिखरे केजरीवाल चढत असताना दिल्लीमध्ये अचानक मद्य घोटाळा झाला, आणि स्वतः केजरीवाल यांच्यासह त्यांचे प्रमुख नेते कारागृहात डांबले गेले. जनतेला दिलेली त्यांची आश्वासने पोकळ वाटू लागली. त्यातच त्यांनी स्वतः साठी जे निवासस्थान उभारले, त्या ‘शीशमहल’चा लेखाजोखा विरोधकांनी बाहेर काढला आणि दिल्लीकरांच्या मनातून ‘आप’ ला पक्ष आणि केजरीवाल यांची टोळी उतरली.
हेही वाचा : ‘आप’ला सर्वात मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव
शेवटी, व्हायचे तेच झाले..दिल्लीकरांनी केजरीवाल यांच्या विरोधात मतदान करण्याचे ठरवले आणि कमकुवत काँग्रेसला बाजूला फेकून ते भाजपाच्या दावणीला जाऊन उभे राहिले.
बलाढ्य भाजपला यशस्वीपणे रोखले
देशात बलाढ्य भाजप यशस्वी होत असतानाही केजरीवालांनी भाजपचा अश्वमेध दिल्लीत अडवला होता, रोखला होता..त्यामुळे हवा डोक्यात शिरली होती, आणि दुसरीकडे केजरीवाल यांची गृहदशाही फिरली होती.
आता, पुढे काय घडणार?
भाजपा आता सत्तेवर आला आहे आणि आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये केजरीवाल आहेत. केजरीवाल यांच्यामागे अनेक खटल्यांचा ससेमिरा निश्चित लागणार आहे.
मुख्य म्हणजे आमच्या संभाव्य आमदारांना प्रत्येकी पंधरा कोटी रुपये देण्याची आँफर देण्याचा आरोप आणि मुख्यतः हरियाणा सरकारने यमुना नदीत विष ओतले याचा केजरीवाल यांनी केलेला आरोप यामुळे त्यांना अटक देखील होऊ शकते. बारा वर्षांपूर्वी केजरीवाल यांनी पंधरा वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या आणि दिल्लीच्या विकासात मोठे योगदान असलेल्या शीला दीक्षित यांचा पराभव केला होता. तेव्हा एक नवा राजकीय तारा उदयाला आला असे वातावरण तयार झाले होते.
.. आता ‘ईव्हीएम’ च्या नावानं..
निवडणूक हरल्यामुळे आता सर्व विरोधकांकडून ‘ईव्हीएम’ मध्ये घोटाळा झाला, अचानक मतदान कसे वाढले, असा आरडाओरडा सुरु होईल. असे ओरडण्याचा अधिकार उबाठा गटाचे संजय राऊत आणि त्यांची टोळी, खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या टोळीतर्फे केला जाईल, त्यात टीम केजरीवाल हे देखील कदाचित सहभागी होतील.
खोटारडे राजकारण चव्हाट्यावर
सर्वसामान्य असल्याचा बुरखा पांघरून राजकारण करणारे केजरीवाल ही एक आकर्षणाची व्यक्ती ठरू लागली. मुख्य म्हणजे त्यांचे खोटारडे राजकारण भलतेच चर्चेत आले. पंचावन्न कोटी रुपये खर्च करुन आणि तीन बंगले पाडून केजरीवाल यांनी स्वतःसाठी बांधलेला बंगला त्यांना लाभणार नव्हताच.
जनतेला सगळेच फुकट
फुकटच्या घरात मुख्यमंत्री म्हणून राहायचे आणि आरामदायी आयुष्य जगायचे असे स्वप्न केजरीवाल यांनी बघितले, पण नशिबाने त्यांना तिहार तुरुंगाची वाट दाखवली. हे लिहिण्याचे कारण म्हणजे एक सामान्य माणूस म्हणून प्रारंभी केजरीवाल यांच्या संदर्भात सर्वांनाच औत्सुक्य होते. पण भ्रमनिरास झाला. लोकांना सगळे फुकट देऊन त्यांना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रकार केजरीवाल यांनी सुरु केला आणि तो लोकप्रिय झाला,
राजकारणात एखाद्या व्यक्ती किंवा संकल्पनेचा होणारा उदय आणि अस्त हा अभ्यासाचा विषय आहे. केजरीवाल हा तरी मोठ्या अभ्यासाचा विषय ठरणार आहे.
भूलथापा.. पण, किती दिवस ?
भारतीय राजकारणामधील एक मोठे थापाडे व्यक्तिमत्व म्हणून केजरीवाल यांचा उदय झाला, आणि त्याच भूलथापानी त्यांचा बळी घेतला.
भाजपाला आता दोन दशकानंतर दिल्लीची सत्ता मिळाली आहे. देशभर सत्ता, पण दिल्ली मात्र दुसऱ्याच्या ताब्यात, अशी काहीशी अवस्था झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीला इतकी वर्षे गुदमरल्यासारखे वाटत असणार.. आजच्या या निकालाने भाजपा देखील मोकळा श्वास घेऊ शकेल, आणि मनाला पाहिजे तसा विकास करू शकेल, याची खात्री आहे !