नगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची मराठीतून पोस्ट; म्हणाले, “आम्ही राज्यातील प्रत्येक…”

PM Modi : राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकींचा निकाल आज, २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला असून भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात तब्बल २०० हून अधिक नगरपालिकांवर महायुतीला विजय मिळाला असून भाजपाने १०० हून अधिक नगरपालिका, नगरपरिषदा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत विरोधकांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या निकालानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्क मराठीत पोस्ट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मराठीतून पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांचे कौतुकही पंतप्रधान मोदींनी केले आहे.
“महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
”भाजपा आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो,” असेही पंतप्रधान मोदी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीतील यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. आकडेवारी देताना ते म्हणाले, २०१७ साली भाजपाचे १६०२ नगरसेवक होते. आता त्याच्या दुपटीने जास्त म्हणजे ३३२५ नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच महाराष्ट्रात नंबर वन पक्ष भाजपाच असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. राज्याच्या जनतेने भाजपाला आणि आमच्या महायुतीला प्रचंड समर्थन दिले आहे. मी यापूर्वीच भाकीत केले होते. निवडून येणाऱ्या एकूण नगराध्यक्षांपैकी ७५ टक्के नगराध्यक्ष हे महायुतीचे असतील. त्याचप्रकारचा कल राज्याच्या जनतेने दिला. तसेच भाजपाच प्रथम क्रमाकांचा पक्ष असल्याचे अधोरेखित झाले आहे. भाजपाचे जवळपास १२९ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तसेच महायुतीचे ७५ टक्के नगराध्यक्ष आहेत,” असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
एकट्या भाजपाचे ४८ टक्के नगरसेवक आहेत. प्रचंड मोठे जनसर्मथन आम्हाला मिळाले आहे. आमचे सहयोगी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही अभिनंदन करतो. त्यांच्याही पक्षाने चांगली कामगिरी केली आहे, असेही फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले.
महाराष्ट्रातील या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यानी देखील पोस्ट केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, “महाराष्ट्र नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला प्रचंड पाठिंबा दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे मनःपूर्वक आभार! हा विजय म्हणजे मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठीच्या धोरणांवर जनतेने दिलेला आशीर्वाद आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो! तसेच, भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महाराष्ट्रातील भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन!”





