पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात वर्षातील शेवटच्या संकष्टीस भाविकांची गर्दी
संकष्टी चतुर्थी निमित्त बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे चिक्की प्रसादाला सुरुवात
![Pali, Ballaleshwar, Temple, Sankashti, Devotees, Crowd, Devasthanam, Chikki, Prasad,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/sankasti-780x470.jpg)
पाली : संकष्टी चतुर्थी निमित्त बुधवारी (ता. 18) अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत भक्ति मळा फुलला होता. वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी असल्याने बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संकष्टी चतुर्थी निमित्त बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे चिक्की प्रसादाला सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे देवाला अर्पण केलेल्या नारळापासून चिक्की तयार केली असून ती उपवासालाही चालते. या माध्यमातून रोजगार निर्मिती देखील होणार आहे.
श्री. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक दाखल झाले होते. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी काही भाविक पायी आले, तर काही भाविकांनी पायी दिंडी आणली होती. संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. भाविकांमुळे येथील हाॅटेल व्यावसायिक व दुकानदारांचा धंदा चांगला झाला.
संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिराला विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांची सजावट केली होती. मंदिरात व मंदिराबाहेर सुबक रांगोळ्या देखील काढल्या आहेत. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची आणि खाऊची दुकाने, नारळ, हार, फुल, पापड व मिरगुंड विक्रेते, सरबतवाले, प्रसाद व पेढेवाले आदिंचा धंदा चांगला झाला. भाविक वा पर्यटकांच्या वाहनामुळे पालीत काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र नाक्यावर तैनात असलेले वाहतूक पोलीस तसेच पूर्णवेळ बल्लाळेश्वर मंदिर ट्रस्टचे सुरक्षा रक्षक वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते.
चिक्की प्रसादाची सुरुवात श्री बल्लाळेश्वराला चिक्की प्रसाद अर्पण करून करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे, उपाध्यक्ष वैभव आपटे, विश्वस्त प्रमोद पावगी, अरुण गद्रे, विश्वास गद्रे, अमोल साठे व डॉ. पिनाकीन कुंटे आदींसह मुख्य पुजारी गणेश कोणकर तसेच धनंजय गद्रे गुरुजी व इतर मान्यवर देवस्थान कर्मचारी शेखर सोमन व पद्माकर फाटक आदी उपस्थित होते.
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियमित विविध उपक्रम राबविले जातात. भाविकांसाठी लाडू प्रसाद सुरु आहे. त्याचबरोबर चिक्की प्रसाद सुद्धा सुरु करण्यात आला आहे. भाविकांकडून देवाला अर्पण करण्यात आलेल्या नारळा पासून ही चिक्की बनवली आहे. भक्त ते देव यांना जोडण्याचा हा प्रयत्न आहे.
या चिक्की प्रसादामध्ये खोबरे, गुळ व वेलची एवढेच जिन्नस असल्याने ती उपवासासाठी चालेल. अवघ्या 30 रुपयांमध्ये आकर्षक पॅकेटमध्ये चिक्की उपलब्ध असून भाविकांचा यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून स्थानिकांसाठी रोजगार वृद्धी देखील होणार आहे. शिवाय भाविकांच्या सोयीसाठी योग्य व अद्ययावत सोयी सुविधा वा व्यवस्था करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.