पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात उघड

Operation Mahadev : चाॅकलेट, पाकिस्तानी ओळखपत्र आणि सॅटेलाइट फोनवरून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. २८-२९ जुलै रोजी ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. या दहशतवाद्यांकडून अशा काही गोष्टी जप्त करण्यात आल्या, त्यामुळे पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे स्पष्ट झाले.
२९ जुलै रोजी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले होते की, ऑपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. पहिल्यांदाच, आमच्याकडे पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांना दिलेली कागदपत्रे आहेत.
मारलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. सुलेमान शाह उर्फ फैसल जट्ट (ए प्लस प्लस ग्रेड दहशतवादी), अबू हमजा उर्फ अफगाण (ए ग्रेड दहशतवादी) आणि यासी उर्फ जिब्रान (ए ग्रेड दहशतवादी) अशी त्यांची नावे आहेत. पाकिस्तानच्या निवडणुकीतील मतदार ओळखपत्र, पाकिस्तान निवडणूक आयोगाने जारी केलेली स्लिप, मतदार अनुक्रमांक, सॅटेलाइट फोनमधून सापडलेले मायक्रो एसडी कार्डही सुरक्षा दलांना सापडले. यामध्ये दहशतवाद्यांच्या कुटुंबाची माहिती देखील होती.
हेही वाचा – विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसातला सुरू करा; पुणे शहर गणेशोत्सव समितीची मागणी
यासोबतच दहशतवाद्यांकडून कराचीमध्ये बनवलेल्या चॉकलेटचे रिकामे पॅकेटही सापडले. हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे धोकादायक दहशतवादी होते. पहलगाम हल्ल्यापासून ते दाचीगाम-हरवनच्या जंगलात लपले होते. सुरक्षा दलांना आणि गुप्तचर विभागाला जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या उपस्थितीची पुष्टी करण्यासाठी अनेक दिवस गुप्त कारवाई करण्यात आली. जेव्हा ते निश्चित झाले तेव्हा ऑपरेशन महादेव सुरू करण्यात आले.
दहशतवादी गुरेझ सेक्टरमधून भारतीय सीमेत घुसले होते. गुप्तचर विभागाने दहशतवाद्यांच्या रेडिओ संभाषणांचा मागोवा घेतला. २१ एप्रिल रोजी दहशतवादी बैसरनपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ढोक भागात पोहोचले. दोन काश्मिरी रहिवाशांनी दहशतवाद्यांना आश्रय आणि अन्न पुरवल्याची कबुली दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी दहशतवादी पायी बैसरन खोऱ्यात पोहोचले.
हल्ल्यानंतर, दहशतवादी ईशान्य भागातील दाचीगाम येथे रवाना झाले. सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान झाडलेल्या गोळ्यांचे काडतुसे आणि ऑपरेशन महादेवमध्ये दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्या फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्या. त्यावरून पहलगाम हल्ल्यात आणि ऑपरेशन महादेवमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी एकाच रायफलमधून गोळ्या झाडल्याची खात्री झाली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





