OYO मध्ये अविवाहित जोडप्यांना ‘नो एंट्री’; नवीन Check-in Rules नेमके काय?
!['No entry' for unmarried couples in OYO; What exactly are the new check-in rules?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/OYO-780x470.jpg)
OYO New Rules | भारतातील शहरात चांगले आणि किमान दर्जा असणारे हॉटेल शोधण्यासाठी ‘ओयो’ चांगलेच लोकप्रिय आहे. मात्र आता ‘ओयो’ने आपल्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. यापुढे अविवाहित जोडप्यांना ‘ओयो’ हॉटेलमध्ये थेट एंट्री दिली जाणार नाही. उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातून हे नवे नियम पहिल्यांदा लागू करण्यात आले आहेत.
‘ओयो’ने अविवाहित जोडप्यांना सरसकट एंट्री देण्यावर बंदी आणली आहे. जर यापुढे जोडप्यांना ‘ओयो’मध्ये रुम बुक करायची असेल तर त्यांना त्यांच्या लग्नाचा पुरावा द्यावा लागेल. हा नियम ऑनलाईन बुकिंगसाठीही लागू करण्यात आला आहे. ही नियमावली तात्काळ लागू करावी, असे निर्देश ‘ओयो’ने मेरठमधील संलग्न हॉटेल्सना दिले आहेत.
हेही वाचा – PCMC | मालमत्ता कर थकबाकीदार हॉटेल, मॉल, पेट्रोल पंप, मंगल कार्यालये, कंपन्या महापालिकेच्या रडारवर!
कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे की, सदर बदल केल्यानंतर मेरठचा अनुभव घेऊन इतर शहरातही अशाच प्रकारचे बदल केले जाणार आहेत. मेरठसह इतर काही शहरांमधून नागरिकांकडून ‘ओयो’कडे याबाबत वारंवार विचारणा होत होती. ‘ओयो’ हॉटेलमध्ये अविवाहित जोडप्यांना रुम बुक करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशा मागण्या इतर शहरांमधून समोर आलेल्या आहेत, अशी माहिती ओयोने दिली.
ओयोचे उत्तर भारत क्षेत्राचे प्रमुख पावस शर्मा म्हणाले की, सुरक्षित आणि जबाबदार अशी आदरातिथ्याची सेवा देण्यासाठी ओयो कटिबद्ध आहे. आम्ही वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करतो. पण ज्या प्रदेशात आमचा व्यवसाय सुरू आहे, तेथील कायदा आणि नागरी संघटनांना सहकार्य करणे, हीदेखील आमची जबाबदारी आहे. या बदलानंतर आम्ही वेळोवेळी या धोरणाचा आणि त्याच्या परिणामांचा आढावा घेत राहू.