किम जोंग-उन यांच्या भेटीनंतर डीएनएचा एकही पुरावा ठेवला नाही!
पुतिनसोबतच्या बैठकीनंतर उत्तर कोरियाचा ‘साफसुथरा’ कारनामा व्हायरल

बीजिंग : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग-उन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची चीनमध्ये झालेली ऐतिहासिक बैठक आता नव्या चर्चेचा विषय ठरत आहे. चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे किम यांचा ‘अत्यंत गोपनीय’ शिस्तबद्ध स्टाफ, ज्यांनी बैठकीनंतर त्यांच्या नेत्याने स्पर्श केलेल्या प्रत्येक वस्तूचा पुरावा शून्यावर आणला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये किम जोंग-उन यांच्या स्टाफने वापरलेली खुर्ची, टेबल आणि अगदी पाण्याचा ग्लासही अत्यंत सावधगिरीने उचलून नेल्याचे दिसून येत आहे. “डीपीआरकेच्या प्रमुखांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या उपस्थितीच्या सर्व खुणा नष्ट केल्या,” अशी माहिती रशियन पत्रकार अलेक्झांडर युनाशेव्ह यांनी त्यांच्या ‘युनाशेव्ह लाईव्ह’ टेलिग्राम चॅनेलवर दिली आहे.
किम जोंग-उन ज्या खुर्चीवर बसले होते त्या खुर्चीचे लाकडी हँडल्स, टेबलची पृष्ठभाग, आणि अगदी वापरलेला ग्लासही एका ट्रेमध्ये ठेवून घेऊन जाण्यात आला. हा प्रकार घडला बीजिंगमध्ये पार पडलेल्या लष्करी परेडनंतर, जेथे उत्तर कोरियाचे आणि रशियाचे वरिष्ठ नेते एका गोपनीय बैठकीसाठी जमले होते.
विशेष म्हणजे, अशा पद्धतीने जैविक पुरावे नष्ट करण्याचा प्रकार जगात फारच कमी नेत्यांकडून केला जातो. मात्र पुतिन यांची सुरक्षाही तितकीच काटेकोर असल्याचे दाखले याआधीही मिळाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, परदेश दौर्यावर असताना पुतिन यांचे अंगरक्षक त्यांच्या मूत्र व विष्ठेचा नमुना गोळा करून त्याला सीलबंद पिशव्यांमध्ये ठेवतात, आणि तो नंतर विशेष ब्रीफकेसमधून मॉस्कोला परत पाठवतात.
ही पद्धत रशियन राष्ट्राध्यक्षांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही गुप्त माहिती शत्रू राष्ट्रांच्या हाती लागू न देण्याच्या हेतूने राबवली जाते. अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या पुतिन यांच्या भेटीदरम्यानही अशीच खबरदारी घेतल्याची माहिती आहे.
विश्लेषकांच्या मते, किम यांची ही दक्षता रशियाच्या फॉरेन्सिक तंत्रज्ञानापासून बचाव करण्यासाठी असू शकते, तर काही जण यामागे चीनचा दबाव किंवा निरीक्षण असल्याची शक्यता वर्तवत आहेत.
जगभरातील शक्तिशाली नेत्यांनी आपल्या जैविक ओळखींच्या सुरक्षेसाठी घेतलेली ही अतिशय काटेकोर काळजी, आंतरराष्ट्रीय राजकारणात तंत्रज्ञान, गुप्तचर यंत्रणा आणि सामरिक गणिते किती खोलवर पोहोचली आहेत, याचेच प्रत्यंतर देत आहे.