केरळमध्ये निपाह विषाणूचा पुन्हा शिरकाव, 12 वर्षीय मुलाचा मृत्यु
![Nipah virus re-emerges in Kerala, 12-year-old dies](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/nipah_4.jpg)
केरळ – जिवघेण्या निपाह विषाणूची लागण झालेल्या केरळमधील 12 वर्षीय मुलाचा मृत्यु झाला आहे. येथील कोझिकोड रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. केंद्र सरकारने राष्ट्रीय रोग नियंत्रण पथक केरळला तात्काळ पाठवलं आहे. केरळ सरकारकडून या पथकाला योग्य ती मदत पुरवली जाणार आहे. तीन सप्टेंबर रोजी 12 वर्षीय निपाह संशयित मुलगा कोझिकोड रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्या मेंदूला सूज आलेली अन् ह्दयस्नायूचा दाह असा त्रास होत होता. आज सकाळी त्या 12 वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
कोझिकोड येथे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी पथक नेमण्यात आल्याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी दिली. निपाह विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. तसेच संपर्कातील लोकांना विलगीकरणात ठेवलं जाईल. यावर काम सुरु करण्यात आलं आहे. निपाह विषाणू आढळला म्हणून घाबरुन जाण्याची गरज नाही. पण आपण सावधगिरी बाळगायला हवी, असे विना जॉर्ज म्हणाल्या.
निपाहची लागण झालेल्या 12 वर्षीय मुलाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील अथवा इतरांमध्ये कोणतीही लक्षण दिसत नाही. कोझिकोड येथील परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी आज जाणार आहे. माझ्यासोबत मंत्री पीए मोहम्मद रियासही असणार आहेत. अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी दिली.
निपाह विषाणू साधारणपणे वटवाघळात आढळून येतो. हा विषाणू माणसांसाठी धोकादायक समजला जातो. एनआयएने यासंदर्भातील शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. एनआयएच्या माहितीनुसार देशात आतापर्यंत निपाह विषाणूचा चारवेळा उद्रेक झाला आहे. निपाह विषाणूवर अद्याप कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. याशिवाय या विषाणूची लागण झाल्यास मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता 1 ते 2 टक्के असते, पण निपाह विषाणूची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता 65 ते 100 टक्के असते. त्यामुळेच या विषाणूचा धोका जास्त आहे.
मे 2018 मध्ये केरळ राज्यात निपाह विषाणूचा प्रसार झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यात अनेकांना जीव गमवावा लागला होता. शिवाय राज्याच्या सीमा केरळमधील लोकांसाठी बंद कराव्या लागल्या होत्या. केरळमध्ये निपाह विषाणूने आपले भयानक रुप दाखवले होते. 2018 मध्ये केरळमधील 18 जणांना निपाह विषाणूची लागण झाली होती. त्यापैकी 17 जणांच्या मृत्युची नोंद आहे.