ताज्या घडामोडीपाटी-पुस्तक

मुंबई-पुणे विद्यापीठानंतर शिवाजी विद्यापीठात द्वैभाषिक स्वरूपातील प्रमाणपत्र मिळणार!

विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त सोहळा जानेवारी २०२५ मध्ये करण्याची तयारी

कोल्हापूर : यंदापासून शिवाजी विद्यापीठाचे (Shivaji University Kolhapur) पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) मराठी व इंग्रजी भाषेत विद्यार्थ्यांच्या हाती सोपवले जाणार आहे. मुंबई व पुणे विद्यापीठानंतर शिवाजी विद्यापीठात द्वैभाषिक स्वरूपातील प्रमाणपत्र देण्यास सुरुवात होत आहे. त्याबाबतचा निर्णय विद्यापरिषदेत झाला असून, द्वैभाषिक प्रमाणपत्र छापण्यासाठी आवश्‍यक तयारी करण्यात आली आहे.

विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त सोहळा येत्या जानेवारी २०२५ मध्ये करण्याची तयारी सुरू आहे. त्यात सुमारे पन्नास हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे दिली जातील, असा अंदाज आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इंग्रजी व मराठी (English and Marathi language) अशा दोन्ही भाषेतील पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहे. त्यात काही तांत्रिक चुका राहू नयेत, यासाठी परीक्षा विभाग सतर्कतेने काम करत आहे.

द्वैभाषिक प्रमाणपत्र गतवर्षीपासून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. मात्र, अधिकार मंडळांची मान्यता, पदवी प्रमाणपत्राचा फॉरमॅट निश्‍चितीसाठीची प्रक्रिया लांबली गेल्याने ते देता आले नाही. यंदा प्रशासनाने अधिकार मंडळांच्या मान्यता घेत दोन समित्या नियुक्त केल्या. त्यांच्याकडून पदवी प्रमाणपत्राचा फॉरमॅट मान्य झाला. तसेच विविध विषयांच्या भाषांतराचा विषय अत्यंत काटेकोरपणे हाताळणे आवश्‍यक असल्याने, ती नावे मराठीत करण्याची कसरत पूर्ण करावी लागली आहे.

प्रमाणपत्रावर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे. परिणामी द्वैभाषिक प्रमाणपत्रावर ते असणार आहेच. शिवाय विद्यार्थ्याचा पीआरएन नंबर असेल. दरम्यान, पदवी प्रमाणपत्रावर अचूक मराठी नाव येण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध केली आहे.

प्रमाणपत्रावर मराठीतील नावे अचूक यावीत व नावातील संभाव्य चुका टाळाव्यात, याकरिता मराठी नावांची पडताळणी करण्यासाठी www.unishivaji.ac.in संकेतस्थळावर login मध्ये नावाचा तपशील ७ ते १३ डिसेंबरदरम्यान उपलब्ध करून दिला आहे, तरी विद्यापीठाकडे अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी संकेतस्थळास भेट देऊन नावाचा तपशील अचूक असल्याची खात्री करावी. तसेच आवश्‍यक त्या दुरुस्त्या कराव्यात, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.

‘द्वैभाषिक स्वरूपातील प्रमाणपत्र देण्यासाठी गतवर्षी पावले उचलण्यात आली होती. मात्र, ती प्रक्रिया लांबल्याने यंदा त्यात कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. अधिकार मंडळांच्या मान्यता घेत द्वैभाषिक स्वरूपातील पदवी प्रमाणपत्र तयार करण्यात येत आहे.

-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button