विदर्भात करोनाच्या बीए २.७५ उपप्रकाराचे रुग्ण अधिक ; नागपुरात १०६ रुग्ण आढळले
![More patients of BA 2.75 subtype of Corona in Vidarbha; 106 patients were found in Nagpur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/corona.jpg)
नागपूर : नागपूरसह विदर्भात आता करोनाच्या ‘ओमायक्राॅन’मधील ‘बीए’ २.७५ उपप्रकारातील रुग्ण वाढल्याची माहिती आरोग्य विभागाच्या निरीक्षणात पुढे येत आहे. पूर्वी येथे बीए – ४ आणि बीए – ५ उपप्रकाराचे रुग्ण आढळत होते.राज्यातील विविध जनुकीय चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेतील सार्वजनिक आरोग्य विभागाला प्राप्त अहवालानुसार, विदर्भात बीए – ४ आणि बीए – ५ या उपप्रकाराचे एकूण १२ रुग्ण आढळले आहेत.
त्यात सर्वाधिक १० रुग्ण हे नागपूर जिल्ह्यात नोंदवले गेले. तर वर्धा आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तर विदर्भात बीए २.७५ संवर्गातील १६७ रुग्ण नोंदवले गेले. त्यात सर्वाधिक नागपूर जिल्ह्यातील १०६ रुग्ण आढळले. तर यवतमाळ जिल्ह्यात २४, चंद्रपूर जिल्ह्यात १८, गोंदियात ६, गडचिरोलीला ३, अकोलाला २, भंडारात २, वर्धेत २, वाशीमला २ रुग्ण आढळले. त्यामुळे नागपूरसह विदर्भात सध्या करोनाच्या बीए २.७५ उपप्रकाराचे रुग्ण अधिक असल्याचे पुढे येत आहे.
दरम्यान, नागपूरसह सर्वच भागातील करोनाच्या काही रुग्णांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी नित्याने पाठवले जातात. त्यातून सध्या करोनाचा कोणता उपप्रकार आढळत आहे, हे आरोग्य विभागाला कळते. परंतु तुर्तास करोनाचा मृत्यूदर खूपच कमी असल्याने हे रुग्ण योग्य उपचाराने बरेही होत असल्याचे पुढे येत आहे.