मोदींचे मिशन दक्षिण सुरू..! कॉंग्रेस, द्रमुक आणि डाव्या पक्षांवर केला शाब्दिक हल्लाबोल

Narendra Modi : केरळ आणि तमिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांत लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या राजकीय रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दोन्ही राज्यांचा झंझावाती दौरा केला.
त्या माध्यमातून त्यांनी भाजपचे मिशन दक्षिण सुरू करत एकप्रकारे प्रचाराचे रणशिंग फुंकले. त्यांनी कॉंग्रेस, द्रमुक आणि डाव्या पक्षांवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला.
मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून देशभरात भाजपची विजयी घोडदौड सुरू आहे. मात्र, केरळ आणि तमिळनाडूसारखी राज्ये त्याबाबतीत अपवाद ठरली आहेत. दक्षिणेकडील त्या राज्यांच्या सत्तेने अद्याप भाजपला हुलकावणी दिली आहे.
त्यामुळे पक्षाने त्या राज्यांवरील राजकीय फोकस वाढवल्याचे दिसून येत आहे. दोन्ही राज्यांत चालू वर्षी मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका अपेक्षित आहेत. त्यासाठी आता थोडाच अवधी उरला आहे. अशात मोदींनी एकाच दिवशी दोन्ही राज्यांचा दौरा करण्याच्या घडामोडीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
केरळमध्ये प्रदीर्घ काळपासून कॉंग्रेस आणि डावे पक्ष एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. त्या पक्षांवर मोदींनी थिरूवनंतपूरममधील सभेत टीकेची झोड उठवली. त्यांनी कॉंग्रेसचा उल्लेख एमएमसी म्हणजे मुस्लिम लीग माओवादी कॉंग्रेस म्हणून केला.
केरळमध्ये सत्तेवर असणाऱ्या डाव्या पक्षांना त्यांनी शबरीमला सोने चोरी प्रकरणावरून लक्ष्य केले. साक्षात भगवानाचेही सोने चोरण्यात आले. केरळमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर प्रकरणाचा तपास करून गुन्हेगारांना तुरूंगात धाडले जाईल. ही मोदी गॅरंटी आहे, असे ते म्हणाले.
तमिळनाडूतील मोदींची सभा म्हणजे एनडीएचे शक्तिप्रदर्शन ठरले. त्या सभेला अण्णाद्रमुक आणि भाजपच्या इतर मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित राहिले. त्या राज्यातील सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या द्रमुकवर मोदींनी जोरदार टीकास्त्र सोडले.
त्यांनी द्रमुक सरकारचा उल्लेख सीएमसी सरकार म्हणून केला. सी म्हणजे करप्शन (भ्रष्टाचार), एम म्हणजे माफिया आणि सी म्हणजे क्राईम (गुन्हे) असे अर्थ त्यांनी सांगितले. मोदींनी दोन्ही राज्यांमधील जनतेला भाजप आणि मित्रपक्षांना आगामी निवडणुकांत विजयी करण्याचे आवाहन केले.




