सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक; राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध
![सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक; राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/maharaj.jpg)
- राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
सांगली |
पुतळा विटंबनेचा तीव्र शब्दांत निषेध करीत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हयात ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. सांगली, इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत या निंद्य घटनेचा निषेध केला. बंगळुरू येथे दोन दिवसांपूर्वी पुतळा विटबंनेचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वांच्याच भावना तीव्र असून रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक घालून अभिवादन केले. सांगलीमध्ये महापौर दिग्विजय सूर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार, प्रदेश समन्वयक शेखर माने, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, नगरसेवक विष्णू माने, हरिदास पाटील, पद्माकर जगदाळे आदींसह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. बजाज म्हणाले, छत्रपती शिवरायांची महती अशा समाज विघातक शक्तीच्या कृतीमुळे कदापि कमी होणार नाही. अखंड देशाचे श्रध्दास्थान असलेल्या महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कर्नाटक सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी युवा जिल्हाध्यक्ष पवार यांनी केली. इस्लामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून घोषणांच्या निनादात पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. त्यांच्या पुतळ्याची विटंबना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, महिला जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्ष सुनीता देशमाने, शहराध्यक्ष रोझा किणीकर, पदवीधर सरचिटणीस विशाल सूर्यवंशी, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांनी दिला.