म्यानमारमध्ये लष्कराकडून आपल्याच नागरिकांची हत्या, अंदाधुंद गोळीबार
![Military killing of civilians in Myanmar, indiscriminate firing](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-15-at-2.42.48-PM.jpeg)
नेपिडाओ | युक्रेन विरुद्ध रशिया युद्धाकडे सर्वांच्या नजरा असतानाच दुसरीकडे म्यानमारची सेना आपल्याच नागरिकांवर गोळीबार, तसेच हवाई हल्ले करत आहे. त्यामुळे जगात नक्की चाललंय काय असा प्रश्न उभा राहिला आहे. आग्नेय आशियाई देशातील युद्धप्रवण क्षेत्रात सुमारे तीन महिने वास्तव्य करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ही माहिती दिली आहे. फ्री बर्मा रेंजर्स या मानवतावादी मदत संस्थेचे संचालक डेव्हिड युबँक्स म्हणाले की, लष्करी विमाने आणि हेलिकॉप्टर पूर्व म्यानमारमधील भागांवर हल्ले करत आहेत.
त्यांनी सांगितले की, हे हल्ले अशा ठिकाणी होत आहेत जिथे नागरिकांना वैद्यकीय आणि अन्न मदत दिली जात होती. जिथे ते आणि त्यांचे स्वयंसेवक थांबले होते अशा ठिकाणी हल्ले होत आहेत. ते पुढे म्हणाले की, सैनिकही जमिनीवर अंदाधुंद गोळीबार करत आहेत, त्यामुळे हजारो लोकांनी घरे सोडली आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतरची म्यानमारमधील ही सर्वात वाईट लढाई आहे.
दरम्यान, म्यानमारच्या लष्कराने गेल्या वर्षी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या आंग सान स्यू की यांचे सरकार उलथवून सत्ता काबीज केली. त्यानंतर केरेन प्रांताची राजधानी लोईकावजवळ ‘दहशतवादी गट’ नष्ट करण्यासाठी लष्कराने हवाई हल्ले आणि जोरदार गोळीबार केल्याची कबुली दिली होती.