राजस्थानात मिग-२१ कोसळले; विंग कमांडर हर्षित सिन्हा शहीद
![MiG-21 crashes in Rajasthan; Wing Commander Harshit Sinha martyred](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Mig.jpeg)
जैसलमेर | टीम ऑनलाइन
भारतीय हवाई दलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात कोसळून दुर्घटना घडली. त्यात विंग कमांडर हर्षित सिन्हा शहीद झाले. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव व मदतकार्याला सुरुवात केली. दरम्यान, या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाने दिले आहेत.
हवाई दलाच्या जैसलमेर येथील तळावरून मिग-२१ या ट्रेनिंगच्या लढाऊ विमानाने उड्डाण केले. त्यानंतर काही वेळातच ते कोसळले. हा अपघात पाकिस्तान सीमेजवळ झाला. हा संपूर्ण परिसर लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे तिथे कोणालाही प्रवेश नाही. अपघातानंतर हवाई दलाच्या जवानांनी हाती घेतलेल्या शोध मोहिमेत विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृतदेह सापडला. त्यांचे या अपघातात निधन झाले, असे भारतीय हवाई दलाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीत म्हटले आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जैसलमेरपासून साधारण ७० किलोमीटरवर हा अपघात झाला. दरम्यान, ऑगस्ट २०२१ मध्ये बाडमेर येथे मिग-२१ विमान कोसळले होते. परंतु या अपघातातून पायलट बचावला होता. रशिया आणि चीननंतर भारतात मोठ्या प्रमाणावर मिग-२१ लढाऊ विमानांचा वापर केला जातो. १९६४ मध्ये सुपरसॉनिक लढाऊ विमाने म्हणून ती भारतीय हवाई दलात सामील झाली होती. मिग-२१ या लढाऊ विमानांनी १९७१च्या भारत-पाक आणि १९९९च्या कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.