पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष केल्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
![Medical students charged for celebrating Pakistan's victory](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/जम्मू.jpg)
पाकिस्तान |
जीएमसी आणि स्किम्स मेडिकल कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांवर टी -२० विश्वचषकात पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यापुर्वी मनोहर गोपाला गावातील लोकांच्या निषेधावर सांबा पोलिसांनी याच प्रकरणी एफआयआर नोंदवून सहा तरुणांना अटक केली होती. तर अन्य चौघांचा शोध सुरू आहे. सांबा पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना संपल्यानंतर, मनोहर गोपाला गावात एका समुदायातील तरुणांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, विजय कुमार यांनी आता माहिती दिली आहे की रविवारी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा केल्याप्रकरणी काही वैद्यकीय विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचा एक गट पाकिस्तान संघाच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कॉलेजचे विद्यार्थी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत आनंदात आणि नाचताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांवर आयपीसी कलम १०५ (अ) आणि ५०५ आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या कलम १३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.