ओडिशातील सरकारी रुग्णालयात भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा मृत्यू

Odisha Hospital Fire | ओडिशाच्या कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागून किमान १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ट्रॉमा केअर विभागातील आयसीयूला लागलेल्या या आगीचे कारण एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साधारण २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास आयसीयूमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणांतच आग पसरली. त्या वेळी आयसीयूमध्ये एकूण २३ रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी ७ रुग्णांचा आयसीयूमध्येच होरपळून मृत्यू झाला, तर आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हेही वाचा : ‘मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि काही वेळातच आग नियंत्रणात आणली. मात्र आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या अनेक रुग्णांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. इतर जखमी रुग्णांना तातडीने मेडिकल कॉलेजच्या इतर वॉर्डमधील आयसीयूमध्ये हलवण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सकाळीच रुग्णालयात भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांशी चर्चा करून जखमी रुग्णांशी संवाद साधला तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री माझी यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच घटनेमागील नेमके कारण शोधून जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.





