‘महायुती’ त काहीतरी घडतंय, सारखं सारखं का बिघडतंय ?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यात, नव्हे काही वर्षात, असे काही पाहायला मिळाले आणि त्या मागील राजकारणातील दोष आणि कारस्थाने डोके चक्रावून टाकणारी ठरली. २०१९ मध्ये महाराष्ट्रात स्वाभाविक मोठा घाव बसलेल्या भाजपला आणखी तीन वर्षात आपणच सत्तास्थापनेत यायचे असे वाटायला लागले आणि पडलेले सुंदर स्वप्न साकारण्याची वेळ आली आणि त्यांनी ती संधी अचूक साधली !
महाविकास आघाडीचा प्रयोग..
पण, त्याच वेळेस सत्ता स्थापनेच्या निमित्ताने नवी महाविकास आघाडी आली आणि सत्तेची बाजू घेतली गेली. परिणामी महाविकास आघाडीचा अनोखा प्रयोग झाला आणि तो सत्तेत येऊन यशस्वी झाला, असे वाटले. अशक्य असलेली गोष्ट शक्य झाली. शिवसेना आणि काँग्रेस त्यानिमित्ताने एकत्र आले. विचार एकच होता सत्तेपासून भाजपाला दूर ठेवायचे! पण त्याच दरम्यान ढवळाढवळ सुरू झाली आणि एक मोठा भाग दुसऱ्या आघाडीत सामील झाला. त्यामुळे सत्तेचे गणित बदलले आणि महाविकास आघाडीचा गाजलेला प्रयोग सपशेल फसला, असे वाटायला लागले.
पुन्हा नवे समीकरण…
त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक नवीन समीकरण आले. ते समीकरण म्हणजे एकनाथ शिंदेंचा भूकंप ! या भूकंपाने सत्तेत फक्त ढवळाढवळ झाली नाही, तर थेट सत्ताच बदलली. ढवळाढवळ म्हणजे स्फोट असतोच असतो. पण, स्फोट झाला, तरी तितका मोठा आणि कायमस्वरुपी होतोच असेही नाही. पण एकनाथ शिंदे यांनी घडवून आणलेला स्फोट अनेकांच्या मनाला खोलवर जखमा करून गेला. एवढेच नव्हे तर कटू राजकारणाचा अनुभव देऊन गेला.
‘महायुती’ पातळीवर बरेच काही..
आजही स्थायी स्वरूपाचे, विश्वासार्हतेचे ‘महायुती’ पातळीवर बघितले, तर बरेच काही शिल्लक आहे. विशेषतः घडताना खूप काही दिसत आहे. त्यामुळे तात्पुरता आणि सुरुवातीचा सत्तास्थापनाचा उद्देश आहे. पण, वस्तुतः दररोजचभूकंप चालू आहे. त्यामुळे दुर्दैवाने म्हणावे वाटते, की आजही,’महायुती’ त काहीतरी खडबडत आहे नीतीमत्ता कोलमडत आहे.
हेही वाचा – ‘तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सार्वजनिक कार्यक्रमातच टोले..
कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात ‘महायुती’ चे नेते हे एकत्र असतील, असे हृदयापासून सर्वांना वाटत असते. ते कधीच संवाद साधताना दिसत नाहीत हे बरे वाटत नाही ! माध्यमांमधूनही याचेच चित्र समोर येते. हे चित्र सुन्न करणारे नक्कीच आहे. ‘महायुती’ मध्ये तरी एकसंधपणे पुढे जाणे सुसंभव वाटत नाही. कारण, ‘महायुती’ च्या निमित्ताने अस्तित्व टिकवायचे चित्र दिसून येते. उदाहरण द्यायचे तर एकनाथ शिंदेंचे देऊ या. थोडक्यात,अर्थ स्पष्ट करायचा झाला तर, महायुतीमुळे त्यांची ताकद वाढली आहे. पण, ते महायुती बरोबर एकसंध झालेले दिसत नाहीत. त्यांच्या मंत्र्यांची आणि आमदारांची वागणूक सवता सुभा मांडल्यासारखी आहे. मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठीच आपण एकत्र आलो आहोत हे त्यांच्या मनात कायम आहे!
तुमचा हेकटपणा पण सरकार अडचणीत..
एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांमधील समृद्धीचा अभाव आणि हेकटपणा वारंवार पुढे येतो आणि मुख्यमंत्र्यांची मात्र कसरत होते, याला काय म्हणायचे? त्यांना आपल्या मूळ पक्षात परतायचे आहे का, असा प्रश्नही येऊन जातो. परंतु, सत्तेतील दार उघडे असल्यामुळे परतीचा दरवाजा बंद आहे, हे त्यांनाच काय एकनाथ शिंदे यांनाही माहीत आहे.
आपल्याच सरकार विरोधी वक्तव्य..
जी गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची तीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची! सरकारमधील एखादी गोष्ट पटली नाही तर ती आपल्या नेत्याला सांगावी. पण तसे न करता हे आमदार किंवा मंत्री थेट सार्वजनिक ठिकाणी बोलून मोकळे होतात आणि आपल्या नेत्याला तसेच मुख्यमंत्र्याला वेळोवेळी अडचणीत आणतात. नावे कुणाची घ्यायची ? मंत्रिमंडळात फेरबदल करून हे प्रश्न सुटणारी नाहीत तर कायमची शस्त्रक्रिया केल्याशिवाय हा कॅन्सर हटणार नाही!
भाजपामध्ये ही बेछूट नेते..
शिंदे आणि अजितदादांच्या मंत्र्यांवर, आमदारांवर काही कारवाई होत नाही, हे लक्षात आल्यामुळे भाजपचेही अनेक नेते अस्वस्थ आहेत तर अनेकांचे तोंड सुटले आहे. त्यामुळे ‘महायुती’ त चाललेले हे सगळे महाभूकंपाचे चित्र आहे, असे नकळत वाटून जाते. आजच्या सत्तेचे राजकारण हे केवळ अस्तित्वावर टिकून आहे. त्यामुळेच विरोधी पक्षामध्ये आजही अस्वस्थता आहे. कदाचित, त्यामुळेच अनेक नेते आजही विरोधकांकडे वळताना दिसत आहेत.
राज्याचे राजकारण अस्पष्ट आणि धूसर..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मन मोकळेपणाने काम करण्यास द्यायचे नाही, असे ठरवूनच जणू काही मित्र पक्षाच्या मंत्र्यांनी शपथ खाल्लेली दिसते. तिकडे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल एकनाथ शिंदेंच्या विरोधात गेल्यास शिंदे यांना पुन्हा नव्याने एकत्र येणे गरजेचे आहे, असे वाटून जाते. सध्या मात्र ‘महायुती’ चे चित्र अतिशय अस्वस्थ करणारे आहे. हे चित्र पुढे काय परिणाम करणार, हे सांगता येत नाही. पण त्याचे परिणाम वाईटच होणार आहेत, हे नक्की !
एकनाथ शिंदे गट अस्वस्थ..
महाराष्ट्राच्या एकूण राजकारणात एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि गट अतिशय अस्वस्थ आणि नाराज असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासाठी ते चित्र बरे नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी हा डाव खेळला जात आहे का? याचे उत्तर लवकरच मिळेल. मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना त्यांच्या खात्यावर विश्वास दिला पाहिजे. अन्यथा, ही अस्वस्थता सत्तेचे समीकरण बदलणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सुद्धा हे चित्र वेगळे होणार आहे, याचा विचार केला गेला पाहिजे.
अजितदादांचे तिसरेच..
जी गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची आहे तीच अजितदादांच्याही ! फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे सत्तेच्या घट्ट दोरीमुळे एकत्र आहेत..विकास कामांमुळे आणि मनांमुळे एकत्र आहोत, असे त्यांनी जनतेला दाखवले पाहिजे. नाहीतर जनतेचा विश्वास या सरकार वरील उडत चालला आहे..तो कायमचा उडेल, आणि आगामी महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा प्रचंड फटका बसल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित !




