‘महायुती’ मध्ये आता, वादाचे भोंगे वाजणार!
मशिदीवरील भोंग्यांचा वाद पेटण्याची चिन्हं असून किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा हिंदुत्वाचा जागर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धर्मनिरपेक्षतेचा राग पुढं आल्यामुळं ‘महायुती’ मध्ये वादाचे भोंगे वाजणार, हे मात्र स्पष्ट झालं आहे.
अजितदादांची तंबी..
किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये. मशिदीच्या भोंग्यावरुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सोमय्या जबाबदार असतील, असं अजित पवार यांनी फक्त सुनावलंच नाही, तर थेट तंबीच दिली आहे. भाजपाचा हिंदुत्वाचा जागर अन् अजितदादांचा धर्मनिरपेक्षतेचा राग, महायुतीत वादाचे भोंगे वाजणार, आणि वाजलेच तर केव्हापासून? हे मात्र अनिश्चित झाले आहे.
सरकारच्या धोरणाची चिरफाड..
अजितदादा ‘महायुती सरकार’ मध्ये उपमुख्यमंत्री आहेत. पण, महायुती सरकारमध्ये राहून सरकारच्या धोरणांची चिरफाड करण्याचं तंत्र अजितदादांनी अवगत केलं आहे. मुद्दा हिंदुत्वाचा असो, हिंदीचा असो अथवा अल्पसंख्याकांचा… दादांची भूमिका सरकारच्या निर्णयांविरोधातच राहिल्याचं दिसून आलं आहे.
हिंदी वरून सरकारला घरचा आहेत..
आधी हिंदीवरून सरकारला घरचा आहेर दिल्यानंतर आता मशिदीवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून दादांनी आपलाच मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या सोमय्यांची कानउघाडणी केली.
‘ईडीची पीडा’ स्पेशल !
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या मागं ‘ईडीची पिडा’ लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या किरीट सोमय्यांनी आपला मोर्चा मशिदीवरच्या भोंग्याकडं वळवला. मशिदीवरच्या भोंग्याविरोधात आरोळी ठोकणाऱ्या किरीट सोमय्यांना अजितदादांनी खडे बोल सुनावले. दुसरं कुणी नाही तर थेट उपमहायुती सरकारमधले मुख्यंमत्री अजित पवारच मैदानात उतरले.
हेही वाचा – “हे सरकार कॉन्ट्रॅक्टर धार्जिण”; शक्तीपीठ महामार्गावरून सतेज पाटलांचा सरकारवर हल्लाबोल
मुस्लिम आमदारांची अजितदादांकडे तक्रार..
मशिदींवरच्या भोंग्यांवर कारवाई करण्यासाठी सोमय्या दबाव टाकत असल्याची तक्रार मुस्लिम आमदारांनी अजितदादांकडं केली. त्यानंतर अजितदादांनी सह्याद्री अतिथीगृहावर या विषयावर थेट बैठकच घेतली. या बैठकीला मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती, सपाचे आमदार अबू आझमी, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि सना मलिक, झिशान सिद्दीकी आणि इतर काही मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.
सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये..
बैठकीत अजितदादांनी आपल्याच सरकारमध्ये मित्रपक्षाचे नेते असलेल्या सोमय्यांसाठी थेट फर्मानच काढलं. किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, अशी सूचना अजितदादांनी केली. सोमय्या मशिदीत गेल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं दादा म्हणाले. थोडक्यात काय अजितदादांनी सोमय्यांना भेट दमच भरला आहे !
कायद्याच्या चौकटीत बघा..
कायद्याच्या चौकटीत बसत असलेल्या मशिदींवर कारवाई नको, अशी सूचना अजितदादांनी केली. तणाव निर्माण झाल्यास त्याला भाजपा नेते किरीट सोमय्या जबाबदार असतील, असं निवेदन मुस्लिम संघटनांनी दिलं आणि ती बाब अजितदादांनी अतिशय गांभीर्यानं घेतली.
पोलिसांची अडचण समोर..
मुस्लिम संघटनांकडून सुरू असलेल्या आरोपांबाबत पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी देखील पोलिसांची अडचण अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिली. 46 ते 56 डेसिबल मर्यादा पाळणे शक्य नसल्याचं म्हटलं असल्यामुळं मोबाईलवर प्रात्यक्षिक करून दाखवताना त्यांच्या सुरू असलेल्या बैठकीतील आवाज देखील ४६ डेसिबलपेक्षा जास्त आहे असं स्पष्ट केलं आहे. ही अडचण पुढील काळात येणाऱ्या मोठ्या सणांच्या बाबतदेखील होऊ शकते हे देखील स्पष्ट केलं आहे!
मुस्लिम नेत्यांकडून टीकेची झोड !
या बैठकीच्या वेळी आणि नंतर मुस्लीम नेत्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीकेची झोड उठवली. नियम केवळ आमच्यासाठीच आहेत का? असा प्रश्न समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केला. तर प्रशासनाचा निर्णय आमच्या बाजूनं असेल असा विश्वास वारिस पठाण यांनी व्यक्त केला.
भाजपाकडून सोमय्यांची पाठराखण !
एकीकडे भोंग्याच्या मुद्द्यावरून अजितदादांनी तंबी दिली, असली तरी भाजपानं मात्र किरीट सोमय्यांची पाठराखण केली आहे. किरीट सोमय्या यांची मागणी योग्य आहे, असं भाजपाचे मंत्री आशिष शेलार म्हणाले आहेत.
मनसेचा मुद्दा ‘हायजॅक’?
खरंतर मशिदीवरच्या भोंग्यांवरून सर्वात आधी आवाज उठवला तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं.. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदुत्वाचा जागर करत भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. आता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपानं किरीट सोमय्यांना पुढं करत मनसेचा भोंग्यांचा मुद्दा ‘हायजॅक’ करण्याचा डाव टाकला आहे, हे प्रत्येकाच्या लक्षात आलं असेलच !
अंतर्गत मतभेदांना तोंड फुटले..
विशेष म्हणजे भाजपानं हाती घेतलेल्या भोंग्यांविरोधातल्या मोहिमेवरून त्यांच्याच सरकारमधल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दंड थोपटलेत आणि अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. आपल्याच सरकारच्या एखाद्या धोरणाला विरोध करण्याची अजित पवारांनी ही पहिलीच वेळ नाही. पहिलीपासून हिंदीसक्तीविरोधातही त्यांनी ठाम भूमिका घेत पहिलीपासून हिंदी नको असं म्हटलं आहे.
महायुतीत आता वादाचे भोंगे ?
हिंदुत्वाची भाषा करणाऱ्या ‘महायुती’ सरकारमध्ये राहून अजितदादा अल्पसंख्याकांचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या व्होटबँकेकडे लक्ष ठेवत धर्मनिरपेक्षतेशी इमान बाळगून आहेत. म्हणूनच मुस्लिम समाजाचं म्हणणं ऐकून घेत त्यांनी भाजपच्या सोमय्यांना खरंखोटं सुनावण्याचं धाडस केलं. आता महायुतीचं हिंदुत्वाचा जागर आणि अजितदादांचा धर्मनिरपेक्षतेचा राग यावरून सरकारमध्येच वादाचे भोंगे वाजण्याची शक्यता आहे. या दोन मित्र पक्षांमधील भोंग्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मात्र कानठळ्या बसणार आहे हे नक्की!




