महाकुंभ मेळ्याला आजपासून सुरूवात; कशी झाली कुंभमेळ्याची सुरुवात?
![Mahakumbh Mela begins today; How did the Kumbh Mela begin?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Maha-Kumbh-Mela-2025-780x470.jpg)
Maha Kumbh Mela 2025 | जगातील सर्वांत मोठा मेळावा असलेल्या महाकुंभला आज, सोमवारपासून पहिल्या शाही स्नानाने सुरुवात होणार आहे. पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरू होणारा हा सोहळा ४५ दिवस चालेल. दर १२ वर्षांनी होणाऱ्या महाकुंभसाठी हजारो साधू-संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. पुढील दीड महिन्यात तब्बल ३५ कोटी भाविक येतील, अशी शक्यता गृहीत धरूनच उत्तर प्रदेश सरकारने या महासोहळ्याची तयारी केली आहे.
१३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होत असलेल्या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये आले आहेत. मुख्य सोहळा सुरू होण्यापूर्वीच, शनिवारी गंगा-जमुना आणि अदृश्य स्वरूपातील सरस्वती नद्यांच्या संगमावर तब्बल २५ लाख भाविकांनी स्नान केले.
हेही वाचा – ‘खो-खो विश्वचषक-२०२५’ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर
कधीपासून केले जात आहे आयोजन?
कुंभमेळ्याचा उल्लेख प्राचीन कथा, ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या सोहळ्यामागील प्राचीन कथा विशेष लोकप्रिय आहे. समुद्र मंथनावेळी देव आणि दानवांमध्ये अमृत प्राप्त करण्यासाठी मोठा संघर्ष झाला. त्यावेळी या अमृतातील काही थेंब प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी पडले. त्यामुळे या शहरांमध्येच या धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले जाते.
दर १२ वर्षांनी या सोहळा आयोजन करण्याचे कारणही खास आहे. अमृत असलेले कलश स्वर्गात पोहोचण्यासाठी १२ दिवस लागले होते. देवांसाठी १ दिवस म्हणजे पृथ्वीवरील १२ वर्ष मानले जातात. त्यामुळे दर १२ वर्षांनी या सोहळ्याचे आयोजन केले जाते. पुराणांमध्येही कुंभ या शब्दाचा उल्लेख आढळतो.
पहिल्यांदा या सोहळ्याचे कधी आयोजन करण्यात आले होते, याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. परंतु, ८५० वर्षांपूर्वी आदि शंकराचार्य यांनी याची सुरुवात केल्याचे सांगितले जाते. शाही स्नानाची सुरुवातही १४ ते१६व्या शतकात झाली असण्याचा अंदाज आहे. चीनी प्रवासी ह्युएन त्सांग याने त्याच्या लिखाणामध्ये सम्राट हर्षवर्धनाच्या काळात अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे नमूद केले आहे. मुगलकाळात १६६५ मध्ये लिहिलेल्या खुलासातु-त-तारीख गॅजेटमध्येही याचा उल्लेख आहे.