J&K : खासदार फारुख अब्दुल्ला यांची अखेर 7 महिन्यांनंतर सुटका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Farooq-Abdulla.jpg)
श्रीनगर | गेल्या 7 महिन्यांपासून नजरकैदेत असलेले जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांची अखेर सुटका केली जात आहे. त्यांच्या विरोधात लावण्यात आलेले पब्लिक सेफ्टी अक्ट (पीएसए) सुद्धा हटवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरातून कलम 370 हटवले. तेव्हापासून फारुख अब्दुल्ला यांच्यासह इतर दोन माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांना नजरकैद करण्यात आले होते. त्या सर्वांच्या विरोधात पब्लिक सेफ्टी अॅक्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ओमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांचा देखील समावेश आहे.
जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने शुक्रवारी फारुख अब्दुल्ला यांच्यावरील पीएसए हटवत असल्याचे आदेश जारी केले. त्यानुसार, श्रीनगरच्या कोर्टाने फारुख अब्दुल्ला यांच्या विरोधात 15 सप्टेंबर रोजी पीएसए लागू केला होता. त्याला राज्यपालांच्या आदेशाने डिसेंबर महिन्यात 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली.
यानंतर मात्र, ती मुदतवाढ न करता त्यांच्यावरील पीएसए हटवण्याचे आदेश दिले जात आहेत. जम्मू काश्मीर सरकारने याची माहिती स्थानिक न्यायालयासह जम्मू काश्मीर पोलिस आणि इतर महत्वाच्या कार्यालयांना पाठवली आहे.