जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकात एक्सप्रेसचा भीषण अपघात
निव्वळ अफवा पसरल्याने प्रवाशांचा बळी
जळगाव : जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला आहे. पुष्पक एक्सप्रेस स्टेशन सोडून दूरवर थांबली होती. त्यामुळे काही प्रवाशी एक्सप्रेसच्या खाली उतरले होते. तितक्यात कर्नाटककडे जाणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले. तब्बल 35 ते 40 प्रवाशांना एक्सप्रेसने उडवलं. त्यात जवळपास 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. निव्वळ अफवा पसरल्याने प्रवाशांनाचा बळी गेला. विशेष म्हणजे पुष्पक एक्सप्रेस थांबलेली असतानाही प्रवाशांनी अतिघाई केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
संदीप जाधव या प्रवाशाने या अपघाताची माहिती दिली आहे. संदीप जाधव हे सुद्धा पुष्पक एक्सप्रेसने प्रवास करत होते. ही एक्सप्रेस मुंबईकडे निघाली होती. पण मध्येच परधाडीच्या पुढे ही एक्सप्रेस थांबली. ही एक्सप्रेस स्टेशन सोडून लांब जंगलात थांबली होती. काही प्रवाशी स्लीपरच्या दरवाजात बसले होते. गप्पा मारत होते. एक्सप्रेसने अचानक ब्रेक मारला. करकचून ब्रेक बसल्याने चाकांमधून आगीच्या ठिणग्या निघाल्या. ठिणग्या मोठ्या होत्या. त्यामुळे स्लीपरला बसलेले लोक घाबरले. कुणी तरी गाडीला आग लागली… आग लागली असं ओरडलं. अफवा पसरली… त्यामुळे गाडीत एकच हल्लकल्लोळ माजला. लोक घाबरून सैरावैरा पळत होते. काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी एक्सप्रेसमधून उड्या मारल्या अन् दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या लोकांना उडवलं. हा अपघात अत्यंत भीषण होता. वेदनादायी होता. ही अत्यंत दु:खद घटना आहे, असं संदीप जाधव यांनी सांगितलं.
हेही वाचा : महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एक्सप्रेस सुरू
आज दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. एक्सप्रेसच्या चाकांमधून ठिगण्या उडाल्यानेच आगीची अफवा पसरली आणि लोकांनी गाडीतून उड्या मारल्या. त्यामुळे ही दुर्घटना घडली. आता एक्सप्रेस सुरू झाली आहे. मी पाचोऱ्याच्या पुढे आलो आहे, असं संदीप जाधव यांनी सांगितलं.
जखमींवर उपचार सुरू
पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्यानंतर जखमी प्रवाशांना जळगाव रेल्वे स्थानकाकडे नेण्यात आलं आहे. काही प्रवाशांना पाचोरा रुग्णालयात नेण्यात आलं आहे. सात ते आठ प्रवाशी या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती घेत आहेत.