ताज्या घडामोडी

‘इंडी’ आघाडी संपली, महा ‘बिघाडी’त जुंपली!

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांना मिळालेला कौल पाहता, आता पाच वर्षे काहीच उद्योग नाही, असे समजून केंद्रात ‘इंडी’ आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीने आपले चंबूगबाळे गुंडाळण्याचे ठरवले आहे.

केंद्रातली आघाडी तर संपली आहे, आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीमध्ये जुंपली आहे, हे महत्त्वाचे ! केंद्रातील इंडी आघाडीतून एक एक पक्ष बाहेर पडत चालले आहेत आणि बहुतेकांनी काँग्रेसवर अपयशाबद्दल आरोप केले आहेत. अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’ त्याचप्रमाणे ममता बॅनर्जी आणि लालूप्रसाद यादव यांच्या पक्षांनीही या आघाडी पासून दूर राहण्यास प्राधान्य दिले आहे, तसे सुनावले असून पावलेही टाकली आहेत.

उबाठा गटाची भंबेरी!

महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खळबळ उडाली आहे, ती शिवसेनेच्या उबाठा गटात ! त्यांना अपेक्षेएवढ्या जागा तर मिळाल्याच नाहीत, उलट त्यांचा सुपडा साफ झाला आहे. निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटावर बेछूट आरोप करत सुटलेला उबाठा गट आत्मविश्वासासह सर्वस्व गमावून बसला आहे. त्यातून मग कधी आपल्या मित्र पक्षांवर जीवघेणी टीका, एकला चलो रे चा नारा किंवा कधी कधी काँग्रेसच्या माथ्यावर अपयशाचे खापर फोडणे असे प्रकार त्यांनी सुरू केले आहेत.

एकूण काय, भारतीय जनता पार्टीने केंद्रात आणि राज्यात विरोधकांना काहीच काम ठेवलेले नाही. भाजपा करीत असलेली कामे पाहा आणि बिनधास्त टीका करत बसा, सभागृहात विरोधी पक्षांची बाके बडवत बसा, एवढे एकच काम केंद्रात आणि राज्यात आघाडीसाठी शिल्लक ठेवले आहे, यात पाच वर्षे बदल होणार नाही, हे देखील त्यांना ठासून सांगितले आहे.

सहा महिन्यात निवडणुकांची शक्यता

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक या सहा महिन्यात होईल, असे दिसत आहे. किंबहुना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीत ‘महायुती’ ला भरघोस यश मिळाले. जनतेने मनोमन ‘महायुती’ चे वर्चस्व मानले आहे. गेल्या अडीच वर्षांपूर्वीचे फोडाफोडीचे राजकारण आणि त्यामुळे जनमानसात निर्माण झालेली नैराश्याची भावना दूर गेली आहे. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, पंचायती, जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सहा महिन्यात होतील,असा अंदाज आहे. म्हणूनच, शहरातील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणच्या मिनी मंत्रालयाच्या या निवडणुकीसाठी सगळेच जण जय्यत तयारीत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वाधिक महत्त्वाची आणि चर्चेची निवडणूक ठरणार आहे ती मुंबई महापालिकेची !

मुंबई महानगरपालिकेसाठी खटाटोप

मुंबई कोणाची, हे वारंवार दाखवून देण्यासाठी मुंबई महापालिका ताब्यात असणे, हे सर्वार्थाने महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिकेची व्याप्ती, अधिकार आणि आर्थिक विस्तार पाहता ही महापालिका म्हणजे राजकारण्यांना राज्य सरकारच्या बरोबरीचे वाटणे स्वाभाविक आहे. देशातील अनेक राज्यांच्या अंदाजपत्रकाचाएवढे अंदाजपत्रक एकट्या मुंबईचे असते, हे लक्षात घ्यायला हवे. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्व पक्षांचे फासे कसे पडणार हेही पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

ताकदवान बनलेली महायुती आणि विस्कटलेली महाआघाडी यांची उमेदवार पेरणी कशी होते, हे महत्त्वाचे आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या गर्जना केल्या जात आहेत. स्वबळाच्या या आरडाओरड्याची पार्श्वभूमी बघायला हवी. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला शिवसेनेच्या उबाठा गटाचा लाभ झाला आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस सोबत असल्यामुळे ठाकरे गटाला दारुण पराभव पत्करावा लागला, असा समज उबाठा गटाचा आहे, काँग्रेसवरचा राग त्यासाठीच आहे.

विश्वास गमावलेल्या महाविकास आघाडीत राहून उबाठा कार्यकर्त्यांचा, मतांचा केवळ वापर केला जात आहे, अशी भावना या गटात तयार झाली आहे. त्यामुळे एकटे लढले असतो, तर अधिक जागा मिळाल्या असत्या, असे स्वतः उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या गटाचे नेते अनेक नेते बोलून दाखवतात. तिकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसचे कंबरडे मोडले, त्यातून काँग्रेस उभी राहू शकत नाही, असे वक्तव्य केले जात आहे. तीनपैकी दोन पक्षांकडून टोकाची टीका होत असतानाच काँग्रेस मात्र आपली थंडपणाची भूमिका सोडत नाही. महाविकास आघाडीची शकले महानगरपालिका निवडणुकीपूर्वी झालेली दिसणार, हे नक्की आहे.

केंद्रात ‘इंडी’ आघाडीत प्रचंड मतभेद !

आता इंडिया आघाडीकडे पाहू. भाजपाचा चौखूर उधळणारा वारू रोखण्यासाठी भाजपा विरोधकांनी एकत्र येत, गाजावाजा करत इंडिया आघाडीची स्थापना केली होती, आठवतं का ? अर्थात, राजकीय स्वार्थासाठी ही मंडळी एकत्र आली होती, हे सर्वांनाच कळलं होतं. विचारांमध्ये एकवाक्यता, ध्येयधोरणे विभिन्न असतानाही केवळ भाजपाविरोध या एकमेव विचाराने ही मंडळी एकत्र आली होती. यात प्रत्येकजण एकेकाळी आपापल्या राज्यात मातब्बर होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आपला टिकाव लागणे शक्य नसल्याने लोकसभा निवडणुकीसाठी ही सर्व मंडळी एकत्र आली व त्यातूनच इंडिया आघाडी देशाच्या राजकारणात जन्माला आली, पण सर्वांची वेगवेगळी तत्वे आणि वेगवेगळ्या दिशेला तोंडे, त्यातून नेतृत्व कोणी करायचे हा वाद, या कारणांमुळे इंडी आघाडीला घरघर लागली, आणि तिची छकले उडाली हे सत्य आहे!

लोकसभा निवडणूक एकत्र लढणे व भाजपाला सत्ता मिळवू न देणे हा एककलमी कार्यक्रम राबविण्यासाठी ही आघाडी कार्यरत झाली. मुळातच इंडिया आघाडीच्या वाटचालीला स्थापनेपूर्वीपासूनच ग्रहण लागले होते. ज्यांच्या संकल्पनेतून इंडिया आघाडी जन्माला आली, ते नितीशकुमारच लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच काही महिने भाजपामध्ये सामील झाले, कर्णधारच मालिका सुरू होण्यापूर्वी प्रतिस्पर्धी संघाचा स्टार फलंदाज अथवा गोलंदाज बनावा, तशीच परिस्थिती नितीशकुमारांच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीची झाली. नितीशकुमार यांनी इंडी आघाडीचा फार चुथडा केला आणि त्यांचा स्वप्नभंग ही करून टाकला. एकूण काय भारतीय जनता पार्टीला हवे तसे फासे पडत आहेत आणि राजकीय सारीपाट खेळण्यात भाजपा तरबेज आहे, हे सांगायला ज्योतिषाची मुळीच गरज नाही !

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button