भारतातील सर्वात उंच ट्विन टॉवर आज पाडणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Twin-Tower-Noada.jpg)
- नवी दिल्ली, नोएडातील गगनचुंबी इमारती अवघ्या नऊ सेकंदात होणार जमिनदोस्त
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
देशातील सर्वांत उंच ट्विन टॉवर आज जमिनदोस्त होणार आहे. अनधिकृत बांधकाम आणि भ्रष्टाचारप्रकरणी नोएडातील सेक्टर 93-ए मधील सुपरटेक एमराल्ड कोर्टमधील १०३ मीटर उंच एपेक्स (Apex) आणि ९७ मीटर उंच सियान (Ceyanne) टॉवर पाडण्यात येणार आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टॉवर पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या नऊ सेकंदात ऐपेक्स आणि सियान हे दोन्ही टॉवर आज पाडण्यात येणार आहेत.
ट्विन टॉवर पाडण्यासाठी जेट डेमोलिशन, एफिस इंजीनिअरिंग आणि सीबीआरईच्या ४६ जणांची टीम कार्यरत असून दररोज १२ तास स्फोटकं लावण्याचं प्रशिक्षण सुरू होतं. त्यामुळे एक ट्रिगर दाबताच अवघ्या नऊ सेकंदात हे महाकाय टॉवर पाडण्यात येतील. ३२ मजली टॉवर्स पाडल्यानंतर येथे ३० मीटर उंचीपर्यंत ढिगारा साचू शकतो. तसेच, शेकडो मीटरपर्यंत धूळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धुळींवर नियंत्रण मिळवण्याकरता येथे जिओ फायबर शिट्स बसवण्यात आले आहेत. झाडांना काळ्या, पांढऱ्या आणि हिरव्या चादरीने झाकण्यात आलं आहे.
दोन्ही टॉवरमधील वेगवेगळ्या मजल्यांवर ३७०० किलो विस्फोटकं ठेवण्यात आली आहेत. तसंच, सुरक्षेच्या कारणास्तव एमराल्ड कोर्ट आणि आजूबाजूच्या परिसरातील जवळपास पाच हजार लोकांना सकाळी सात वाजेपर्यंत आपलं घर रिकामं करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार, नागरिकांना यशस्वीरित्या स्थलांतरित करण्यात आलं आहे. तसंच, तीन हजार गाड्या आणि २०० पाळीव प्राणी यांनाही स्थलांतरीत करण्यात आलं आहे. एडफिस इंजिनीअरिंगचे प्रकल्प अधिकारी मयूर मेहता यांनी सांगितलं की पोलिसांना सूचना मिळताच दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान ट्रिगर दाबण्यात येईल. ट्रिगर दाबताच दोन्ही इमारती जमिनदोस्त होतील.