मोदींच्या वाराणसीत इंडियाचा रोड शो ! प्रियंका, डिंपल यादव होणार सहभागी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/mahaenews-27-780x470.jpg)
modi roadshow : पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी मतदारसंघात उद्या (शनिवार) इंडिया आघाडीचा रोड शो होणार आहे. त्यामध्ये कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल सहभागी होणार आहेत.
सलग तिसऱ्यांदा मोदी वाराणसीमधून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्या मतदारसंघात कॉंग्रेसने पक्षाचे उत्तरप्रदेश प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीने प्रियंका आणि डिंपल यांच्या संयुक्त रोड शोचे आयोजन केले आहे.
हेही वाचा – ‘सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाचा वापर…’, बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
तो रोड शो गेमचेंजर ठरेल, असा विश्वास राय यांनी व्यक्त केला. वाराणसी मतदारसंघ उत्तरप्रदेशातील भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अशात स्वत: मोदी तिथून लढत असल्याने विरोधकांच्या दृष्टीने वाराणसीमधील आव्हान महाकाय मानले जाते. तसे असले तरी विरोधक प्रचारात कुठली कसर सोडणार नसल्याचे रोड शोच्या आयोजनातून स्पष्ट होत आहे.
वाराणसीत सातव्या म्हणजेच अखेरच्या टप्प्यात १ जूनला मतदान होणार आहे. उत्तरप्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी इंडियाचे घटक म्हणून सप आणि कॉंग्रेसने हातमिळवणी केली आहे.