‘ट्विटर’चा कारभार आता भारताचे पराग अग्रवाल सांभाळणार
नवी दिल्ली – अमेरिकन मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी पदाचा राजीनामा दिला असून पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पराग अग्रवाल हे मूळचे भारतीय वंशाचे असून त्यांनी आयआयटी मुंबईमधून शिक्षण घेतले आहे.
जॅक डोर्सी राजीनामा देताना म्हणाले की, ‘कंपनीत सह-संस्थापक ते सीईओ, त्यानंतर अध्यक्ष ते कार्यकारी अध्यक्ष, त्यानंतर अंतरिम-सीईओ ते पुन्हा सीईओ असा १६ वर्षांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आता मला कंपनी सोडण्याची वेळ आली आहे. माझ्यानंतर पराग अग्रवाल कंपनीचा नवा सीईओ असेल.’ डोर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर पराग अग्रवाल यांना ट्विटरची अंतर्गत उद्दिष्टे पूर्ण करावी लागणार आहेत. कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला २०२३ पर्यंत ३१५ डेली ऍक्टिव्ह यूजर करण्याचे आणि वार्षिक उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट दिले होते. डोर्सी हे ट्विटर आणि स्क्वायर या दोन कंपन्यांचे सीईओ म्हणून काम पाहत होते. इलियट मॅनेजमेंटचे संस्थापक गुंतवणूकदार पॉल सिंगर यांनी म्हटले होते की, जॅक डोर्सी यांनी दोन सार्वजनिक कंपन्यांपैकी एकाचे सीईओपद सोडले पाहिजे. त्यामुळेच आता डोर्सी यांनी ट्विटरचे सीईओपद सोडले आहे.
दरम्यान, पराग अग्रवाल यांनी आयआयटी मुंबईतून इंजिनीअरिंग केले असून अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली आहे. ट्विटरवर येण्यापूर्वी त्यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च, याहू रिसर्च आणि एटी अँड टी लॅबमध्येही काम केले आहे.





