अफगाणिस्तानमध्ये भारतीय नर्स अडकली; ४-५ दिवस पुरेल इतकच रेशन शिल्लक
![Indian nurse stranded in Afghanistan; Ration balance is enough for 4-5 days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/taliban-1-3.jpg)
नवी दिल्ली |
अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या कब्जात अनेक लोक अडकले आहेत. कोलकात्यातील संघमित्रा दफदार नावाची एक महिला नर्स तिच्या मुलांसह अफगाणिस्तानच्या शरना शहरात अडकली आहे. तीला १८ वर्षांचा मुलगा अरबाज खान आणि सात वर्षांची मुलगी हिना आहे. शरना आणि राजधानी काबूलमध्ये सुमारे २०० किलोमीटर अंतर आहे. संघमित्रा काबुलला येऊ शकत नाही. कारण तिच्या आजूबाजूला इतर कोणी भारतीय नागरिक नाहीत, ज्यांची ती मदत घेऊ शकते. दरम्यान, तालिबानी तिच्या घराबाहेर फिरत आहेत. त्यामुळे ती संकटात असल्याचे तिच्या कुटुंबाने सांगितले आहे.
संघमित्राला देश सोडायचा आहे. तिच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा देखील आहे. तिची ७५ वर्षीय आई रुबी दफादर यांनी सांगितले की, संघमित्रा तिच्या घरात अडकली आहे. ती बाहेर पडू शकत नाही. तिचा मुलगा घराबाहेर पडला तेव्हा तालिबान्यांनी त्याला त्यांच्या टीममध्ये सामील होण्यास सांगितले.
- मुलीला भारतात आणण्याचे आवाहन
त्याचबरोबर, संघमित्राच्या ८४ वर्षांच्या वृद्ध वडिलांनीही भारत सरकारला आपली मुलगी आणि नातवंडांना भारतात आणण्याचे आवाहन केले आहे. त्याचे वडील मिलन दफादर म्हणाले, “मी आवाहन करतो की ज्या परिस्थितीत ते आहेत, त्यांना त्वरित माझ्याकडे आणावे. मी तालिबान्यांना चांगले ओळखतो ते त्यांना परत पाठवण्यास मदत करतील.” आई संघमित्रा अफगाणिस्तानातून पळून जाण्यासाठी मदतीसाठी कोणाशीही संपर्क साधू शकत नाही. तिचा विवाह कोलकात्यात एका अफगाण युवकाशी झाला होता आणि तिचा मुलगा दोन वर्षांचा असताना ती अफगाणिस्तानला गेली. ती सध्या तिच्या पतीपासून वेगळी राहत आहे. ती ज्या क्लिनिकमध्ये काम करते ती सुद्धा सध्या बंद आहे.
- ४-५ दिवसांचे रेशन शिल्लक
शेजारी राजीव गुहा म्हणाले, संघमित्राकडे फक्त ४-५ दिवसांचे रेशन शिल्लक आहे. तिच्या घराजवळ स्थानिक दुकाने उघडी आहेत, पण भीतीपोटी ते किराणा सामान घेण्यासाठी बाहेर पडत नाहीत. गुहा यांनी सोशल मीडियावर परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. मात्र त्यांना अजून कोणतेच उत्तर मिळाले नाही.