नानांच्या ‘पेन ड्राईव्ह’मध्ये ‘हनी ट्रॅप,’ बड्या धेंडांच्या गळ्याला मात्र चाप !

विधानसभेचा दिवस गाजला तो काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हातात पकडून ठेवलेल्या पेन ड्राईव्हमुळे ! ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकलेले महाराष्ट्रातले मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांची पोलखोल असलेला तो पेन ड्राईव्ह आहे म्हणे ! काहीतरी अल्प फायद्यासाठी ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकून तोंड काळे केलेली ही बडी धेंडे कोण याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागली आहे !
नाना पटोले आक्रमक..!
विधानसभेमध्ये नाना पटोले यांनी यासंदर्भातला ‘पेन ड्राईव्ह’ च दाखवला आणि हनी ट्रॅपचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला, तेथून वातावरण तापण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्रातले काही मंत्री, मोठमोठे अधिकारी हे सगळे ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकले आहेत, असे नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. आता त्यांनी यासंदर्भातला पेन ड्राईव्हच दाखवला. शिवाय ठाणे, नाशिक, मुंबई ही ‘हनी ट्रॅप’ ची केंद्रे बनली आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे आणि सरकारचे मत असेल तर आम्ही तो दाखवू शकतो, असेही पटोले म्हणाले, यातच बरेच गुड सामावले आहे!
नेमके काय म्हणाले नाना पटोले ?
पटोले काय म्हणाले, ते आधी पाहू या..’हनी ट्रॅप’ च्या माध्यमातून राज्याची महत्त्वाची कागदपत्रे ‘अँटी सोशल मुव्हमेंट’ च्या हाती चालली आहेत. मला कुणाचेही चारित्र्यहनन करायचे नाही. मात्र, या सगळ्याबाबत सरकार गंभीर नाही. साधे निवेदनही द्यायला तयार नाही. त्यामुळे अध्यक्षांनी याबाबत निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली. राज्यातील ७२ हून अधिक अधिकारी, काही मंत्री ‘हनी ट्रॅप’ च्या जाळ्यात अडकले आहेत. अशा मंडळींना हाताशी धरले जात असून गोपनीय माहिती गोळा केली जात आहे. तसेच काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यात आले असून त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा विचार केला. पण, सरकार यावर काही बोलायला तयार नाही. पटोले यांचे हे उद्गार पूर्ण सभागृह हादरवून टाकणारे होते, हे नक्की !
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
चक्क ७२ वरिष्ठ अधिकारी अडकले !
दरम्यान, या प्रकरणांमध्ये आजी-माजी मंत्री जाळ्यात अडकल्याचे समोर येत आहे. ही प्रकरणे निव्वळ ‘हनी ट्रॅप’ ची आहेत की अधिकाऱ्यांच्या रासलीला आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. कारण या प्रकरणाचा गौप्यस्फोट नाशिक मध्ये करण्यात आला आहे. त्यात,नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची चर्चा आहे. हा प्रकार नाशिकमधील एका पंचतारांकित सुविधा असलेल्या हॉटेलमध्ये घडल्याचे बोलले जात आहे.
महिलेची तक्रार महत्त्वाची..
नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे आक्षेपार्ह व्हीडिओ असल्यामुळे कोणीही अधिकारी किंवा नेता या ट्रॅपबद्दल उघडपणे समोर येण्यास तयार नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण सध्या गुलदस्त्यात आहे. त्यातील अधिकाऱ्यांची नावे काय ही उत्सुकता मात्र त्यामुळे शिगेला पोहोचली आहे.
नाशिक, मुंबई, पुणे आणि…
या प्रकरणामुळे नाशिकसह मुंबई आणि पुणे येथील बड्या अधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका बड्या नेत्याने केलेल्या या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या ‘हनी ट्रॅप’ मध्ये नेमके कोणते अधिकारी किंवा मंत्री अडकले आहेत, याची चर्चा सुरू आहे पण हे प्रकरण केवळ वैयक्तिक संबंधांपुरते मर्यादित आहे की यामागे काही मोठे षडयंत्र आहे, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप?
या गौप्यस्फोटामुळे नाशिकपासून सुरू झालेली ही चर्चा आता राज्यभर पोहचण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होईल, असे बोलले जात असून या प्रकरणाचे सत्य कधी समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अर्थात् या प्रकरणात बडी धेंडे अडकली असल्यामुळे तपासामध्ये मोठे अडथळे किंवा दबाव येण्याची शक्यताही सध्या नाकारता येत नाही !





