Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार’; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन

मुंबई : भारत आणि ब्रिटन वेगवेगळ्या क्षेत्रात नैसर्गिक भागीदार आहेत. या संबंधांना लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यासारख्या मूल्यांवरचा परस्पर सामायिक विश्वास आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, भारत आणि ब्रिटन दरम्यानची ही वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार ठरली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ झाले असून, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी निर्माण झाल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. मुंबईतील राजभवन येथे आज त्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेनंतर नरेंद्र मोदी व कीर स्टार्मर यांनी संयुक्त निवेदन जारी केले. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी बोलत होते.

प्रधानमंत्री मोदी म्हणाले, यावर्षी जुलै महिन्यात माझ्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर (CETA) सहमती दर्शविली. या करारामुळे व्यापार आणि रोजगार निर्मिती वाढेल आणि ग्राहक तसेच उद्योग क्षेत्र दोघांनाही लाभ मिळेल. ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत आलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे व्यावसायिक प्रतिनिधी मंडळ ही भागीदारीतील नव्या ऊर्जेचे द्योतक असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले. दोन्ही देशांतील उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींची शिखर परिषद, सीईओ मंच आणि जागतिक फिनटेक महोत्सव यांच्या माध्यमातून सहकार्याच्या नव्या शक्यता समोर आल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता सिद्ध करा’; डॉ. प्रसाद प्रधान

प्रधानमंत्री मोदी म्हणाले, आजच्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये इंडो-पॅसिफिक आणि पश्चिम आशियातील स्थैर्य, तसेच युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावरही विचारांची देवाणघेवाण झाली. युक्रेन आणि गाझाच्या मुद्द्यावर भारत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून शांतता पुनप्रस्थापित करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नाचे समर्थन करतो. इंडो पॅसिफिक क्षेत्रात सागरी सुरक्षा विषयक सहकार्य वाढविण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले.

तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये अमर्याद सहकार्याची क्षमता असल्याचे सांगत प्रधानमंत्री मोदी म्हणाले, आम्ही ब्रिटनची औद्योगिक तज्ञता आणि संशोधन क्षमता भारताच्या प्रतिभा व व्याप्तीशी जोडत आहोत. गेल्या वर्षी सुरू केलेल्या भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमातून नवोन्मेषाला चालना मिळत आहे. खनिज क्षेत्रातील सहयोगासाठी नवीन उद्योग संघ स्थापन केला जात असून त्याचा सॅटेलाईट कँपस आयएसएम धनबाद येथे असणार आहे, अशी माहितीही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिली. शाश्वत विकासासाठी दोन्ही देशांनी भारत-युके ऑफशोअर विंड टास्कफोर्स आणि हवामान तंत्रज्ञान स्टार्टअप निधी स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मोदी म्हणाले, ब्रिटनमधील नऊ विद्यापीठे भारतात त्यांचे कॅम्पस सुरू करत आहेत. साऊदम्टन विद्यापीठाच्या गुरूग्राम कॅम्पसचे उद्घाटन झाले असून, गिफ्ट सिटीमध्ये आणखी तीन विद्यापीठांच्या शाखा उभारल्या जात आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button