कोरोनाच्या डेल्टा स्ट्रेनचा वाढता प्रादुर्भाव; ब्रिटनमध्ये 19 जुलैपर्यंत निर्बंध कायम
लंडन – भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला, तरी जगभरातील काही देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन संदर्भातील सर्व निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी लागू करण्यात आलेले निर्बंध 21 जून रोजी संपणार होते.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडमधील निर्बंध इतक्यात हटवले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. त्यांनी सांगितले होते की, ‘आता देशात 40 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी लसीकरण मोहीम आणखी जलद करणार आहोत. मात्र कोरोना विषाणूच्या डेल्टा स्ट्रेनमुळे संसर्गाचा दर आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे निर्बंध हटवण्यासाठी आणखी थोडी वाट पाहणं उत्तम ठरेल.’ तसेच त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, ’19 जुलै हा निर्बंधांचा अखेरचा दिवस असेल.’ दरम्यान, बोरिस यांनी केलेल्या या घोषणेनंतर आता ‘फ्रीडम डे’ 19 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे.