दैनिक भास्करच्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे
![Income tax department raids Dainik Bhaskar's offices](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Dainik-Bhaskar-g.jpg)
नवी दिल्ली – केंद्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकारविरोधात बेधडक लिहिणारे देशातील आघाडीचे वृत्तपत्र ‘दैनिक भास्कर’च्या कार्यालयांवर आज आयकर विभागाने छापे टाकले. देशभरात पसरलेल्या या वृत्तपत्राशी संबंधित मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील अनेक ठिकाणांवर आयकर विभागाने आज सकाळी छापेमारीची कारवाई केली. या वृत्तपत्राचे मालक सुधीर अग्रवाल यांच्या भोपाळमधील अरोरा कॉलनीतील घरावरही छापा टाकण्यात आला. या कारवाईत स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे दैनिक भास्कर सतत केंद्रातील मोदी सरकारविरोधात लिहीत होते, त्यानंतर हळूहळू त्यांच्या सरकारी जाहिराती बंद केल्या होत्या. आता त्यातूनच हे छापे टाकल्याची जोरदार चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने आज सकाळी भोपाळच्या प्रेस कॉम्प्लेक्स येथील द्वारका सदनात छापेमारी केली. यावेळी बुधवारी रात्रीपासून कामावर असलेल्या दैनिक भास्करच्या डिजिटल विभागातील जवळपास दोन डझन कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले. त्याचबरोबर या कार्यालयातील कॉम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणेही आयकर विभागाने ताब्यात घेतल्याचे कळते आहे. दैनिक भास्करच्या अनेक कार्यालयांवर दिल्ली आणि मुंबईतील टीमकडून ही छापेमारीची कारवाई करण्यात आली असून यात १०० हून अधिक अधिकारी सहभागी होते.
दरम्यान, दैनिक भास्कर समूह अनेक वर्षांपासून कार्यान्वित आहे. मागील काही महिन्यांपासून या वृत्तपत्रातून केंद्रातील मोदी सरकारसह मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारविरोधात सातत्याने टीकेची झोड उठवली जातेय. विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान या वृत्तपत्राने अतिशय उघडपणे या दोन्ही सरकारांविरोधात लिहिले होते. मध्य प्रदेश सरकार आणि गुजरात सरकार कोरोना रुग्णांबाबत, लसीकरणाबाबत आकडे लपवत असल्याचे या वृत्तपत्राने छापले होते.