एकाच कामाचे दिवसात दोनदा उद्घाटन
![Inauguration of the same work twice a day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/p.mh-1-2.jpg)
- सांगलीत भाजप आणि आघाडीत श्रेयवादाची लढाई
सांगली |
सांगलीत उभारण्यात येत असलेल्या बालोद्यानाचे भाजप व सत्ताधारी यांच्या श्रेयवादात एकाच दिवसात दोन वेळा उद्घाटन झाले. मात्र प्रशासनाने हा कार्यक्रम कोणी आयोजित केला आहे याचे उत्तर न दिल्याने राजकीय गोंधळ सांगलीकरांना पाहण्यास मिळाला. या वेळी पोलीस आणि भाजप पदाधिकारी यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली. सांगलीतील वाडीकर मंगल कार्यालयानजीक बालोद्यान प्रस्तावित असून महिला व बालकल्याण विभागाच्या निधीतून या उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ७० लाखाचा निधी खर्च होणार आहे. या उद्यानाचे रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र या कार्यक्रमासाठी महापालिकेचे सभागृह नेते विनायक सिंहासने, महिला व बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे-पाटील यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते.
हा प्रभाग महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा असून परस्परच हा कार्यक्रम घेण्यात आल्याने भाजप सदस्य संतप्त झाले होते. हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा भाजपने दिल्याने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तनात करण्यात आला होता. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होण्यापूर्वीच भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी नियोजित ठिकाणी जाऊन श्रीफळ वाढवून उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, संजय बजाज, मनुद्दीन बागवान, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह आयुक्त नितीन कापडणीस उपस्थित होते.