भारतात झायड्स कॅडीला लसीला मिळणार मंजुरी, लहान मुलांसाठीही प्रभावी
![In India, Zyde's caddy will be vaccinated, effective for young children](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/images-1-2.jpeg)
नवी दिल्ली – भारतात लवकरच झायडस कॅडिला लसीला मंजुरी मिळणार असून लहान मुलांसाठी उपलब्ध होणारी ही पहिली लस ठरू शकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झायडस कॅडिला लसीच्या आपत्कालीन वापराला याच आठवड्यात परवानगी मिळण्याची शक्यता असून भारतात उपलब्ध असणाऱ्या लसींमध्ये आणखी एका लसीची भर पडणार आहे.
‘झायड्स कॅडीला’ ही लस `१२ ते १८ वयोगटातील मुलांसाठीदेखील प्रभावी असून पुढील दोन ते तीन आठवड्यांत ती या वयोगटासाठी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे. भारतात लहान मुलांसाठी उपलब्ध होणारी पहिली लस ‘झायड्स कॅडीला ठरू शकणार आहे. तर १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी उपलब्ध होणारी ती भारतातील सहावी लस असेल. आतापर्यंत भारतात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक–व्ही या लसींना मान्यता मिळालेली आहे. तर मॉर्डना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांच्या लसींनाही मंजुरी मिळाली असून लवकरच या लसी बाजारात उपलब्ध व्हायला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, भारत सरकारने डिसेंबर २०२१ पर्यंत सर्व भारतीयांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या मात्र अनेक ठिकाणी लसी उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावत आहे. अनेक भागात लस सरकारी व्यवस्थेत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. मात्र नव्या कंपन्यां सोबत होणाऱ्या करारामुळे देशातील लसींची उपलब्धता वाढणार असून लसीकरणाचा वेग वाढायला मदत होणार आहे. मात्र कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या भारतात तयार होणाऱ्या लसी वगळता इतर लसी मात्र खासगी हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.