दिल्लीत भाजपा नेत्याने पार्कमध्येच गळफास घेत केली आत्महत्या
![In Delhi, a BJP leader committed suicide by hanging himself in a park](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Delhi-BJP-GS-Bawa.jpg)
नवी दिल्ली |
दिल्लीत भाजपा नेत्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भाजपा नेत्याने घराजवळील पार्कमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. पार्कमध्ये संध्याकाळी वॉकसाठी आलेल्या स्थानिकांनी पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जी एस बावा असं या भाजपा नेत्याचं नाव असून भाजपाचे पश्चिम दिल्लीचे माजी उपाध्यक्ष होते. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून तपास सुरु आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भाजपा नेत्याने कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याची शक्यता आहे. मात्र पोलीस किंवा पक्षाने आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप सांगितलेलं नाही. ५८ वर्षीय जी एस बावा हे पश्चिम दिल्लीमधील फतेह नगर येथे वास्तव्यास होते.
सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. जी एस बावा यांचा मृतदेह सुभाष नगरमधील पार्कमध्ये असणाऱ्या तळ्याच्या शेजारी लटकलेल्या अवस्थेत आढळला. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास स्थानिकानी पोलिसांना फोन करुन मृतदेहाची माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळी येऊन पाहणी केली असताना हा मृतदेह भाजपा नेते जी एस बावा यांचा असल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
वाचा- लॉकडाउनसंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…