आयोध्येत २२ जानेवारीलाच बाळाचा जन्म व्हावा यासाठी गर्भवती महिला आग्रही!
Ram Mandir Ayodhya | २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. पण त्याचवेळी अयोध्येमध्ये काहीतरी वेगळंच घडत असल्याचं समोर आलं आहे. २२ जानेवारी रोजी रामलल्लासोबतच आपल्या बाळाचाही जन्म व्हावा, यासाठी गर्भवती माता शस्त्रक्रियेसाठी (सिझेरियन प्रसूती) तयार असल्याचे अर्ज रुग्णालयांकडे येत आहेत. या प्रकारामुळे अयोध्येतील रुग्णालय प्रशासन चक्रावले आहेत.
अयोध्येतील प्रसूती रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येनं दाम्पत्यांचे अर्ज येऊ लागले आहेत. ज्या महिलांची प्रसूती तारीख २२ जानेवारीच्या जवळपास आहे, अशा महिलांनी २२ जानेवारीलाच आपल्या बाळाचा जन्म व्हावा, अशी विनंती करणारे अर्ज करायला सुरुवात केली आहे. रामलल्लांच्या आगमनाबरोबरच आपल्या बाळाचाही जन्म व्हावा, अशी इच्छा या दाम्पत्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यासही ही दाम्पत्य तयार असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा – जी.डी.सी. अँड ए. तसेच सी.एच.एम. परीक्षेचा निकाल जाहीर
रामलल्लांच्या आगमनाच्या दिवशीच आमच्या बाळाचा जन्म व्हावा अशी आमची इच्छा आहे. गेल्या १०० वर्षांपासून आम्ही राम मंदिराची वाट पाहात आहोत. आमच्या बाळाचं या जगात आगमन होण्यासाठी हा एक खूप सुदैवी योग असेल, असं एका गर्भवती महिलेनं म्हटलं आहे.
रुग्णालयाच्या लेबर रूममध्ये आम्हाला रोज १४-१५ दाम्पत्यांकडून २२ जानेवारीलाच डिलिव्हरी व्हावी, असे अर्ज येत आहेत. अशा स्थितीत सामान्य पद्धतीने प्रसूती होणं निव्वळ अशक्य आहे. आम्ही त्यांना यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल, हे समजावून सांगितलं आहे. रुग्णालयाने आत्तापर्यंत २२ जानेवारी रोजी ३५ शस्त्रक्रियांचं नियोजन केलं आहे. आम्ही एरवी दिवसाला फक्त १४ ते १५ शस्त्रक्रिया करतो.
डॉ. सीमा द्विवेदी, विभागप्रमुख