IMF ने पाकला दिलेल्या 1.4 अब्ज डॉलर मदतीवर भारताची नाराजी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-96.png)
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकला मोठा दिलासा दिलाय. कोरोना विषाणूविरोधातील लढ्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून पाकला तब्बल १.४ अब्ज डॉलरची मदत देण्यात आली आहे. पाकिस्तान या निधीचा वापर चुकीच्या पद्धतीने करेल, अशी चिंता व्यक्त करत भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत नाराजीही व्यक्त केली आहे…पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकावर अन्याय होत असून त्यांना या निधीपासून वंचित ठेवू नये, यावरही भारताने जोर दिला आहे.
आयएमएफ बोर्डाच्या बैठकीत भारताचे कार्यकारी संचालक सुरजीत एस भल्ला म्हणाले की, पाकिस्तानने आरोग्य आणि सामाजिक सुरक्षेसंदर्भात कोणताही भेदभाव न बाळगता खर्च करणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळालेली मदतीचा सर्व क्षेत्रात योग्य वापर करावा, असे सांगताना त्यांनी बलूचिस्तान आणि सिंध प्रांतामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचा उल्लेखही केला. पाकिस्तानमध्ये हिंदू, सिख, ईसाई आणि अहमदिया या अल्पसंख्यांक समुदायावर अन्याय होत आहे, यासंदर्भातील एक अहवालही भल्ला यांनी सादर केला.
आयएमएफने जारी केलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट तरतूदीनुसार कोविड १९ मुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला १.४ अब्ज डॉलरची मदत दिली जात आहे. आरोग्य आणि आपतकालीन परिस्थिती पाकला मजबुती देण्याच्या उद्देशाने हा निधी देण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय निधीकडून मदतीची मागणी केली होती.