कोरोनामुळे अधिक मृत्यू झाले, अधिकृत आकडेवारी कमी दाखवली गेली; WHO चा दावा
![Positive news! The number of new corona sufferers in the country is below 1 lakh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/319718852-corona-1532x900-adobestock-2-3.jpg)
नवी दिल्ली – कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जगभरात लाखो मृत्यू झाले. मात्र, जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीपेक्षा अधिक मृत्यू झाले असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं की, 2020 मध्ये जगभरात कोरोनामुळे कमीत कमी 30 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. हा आकडा मृतांच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची अधिकृत आकडेवारी अत्यंत कमी दाखवली जात आहे.
डब्ल्यूएचओच्या सहाय्यक महासंचालक समीरा अस्मा म्हणाल्या, की जगभरात मृत्यूची वास्तविक संख्या ही दाखवल्या गेलेल्या आकड्यांपेक्षा खूप जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या जागतिक आरोग्य अहवालात म्हटलं आहे की, 31 डिसेंबर 2020 पर्यंत जगभरात 8 कोटी 20 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली होती तर 18 लाखाहून अधिकांचा मृत्यू झाला होता. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार ही संख्या खूप जास्त आहे.
आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, WHO नं म्हटलं की 2020 मध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोरोनामुळे कमीत कमी 30 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. देशांनी सांगितलेल्या अधिकृत संख्येपेक्षा हा आकडा तब्बल 12 लाखानं जास्त आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की संघटनेला मृतांची सध्याची संख्या 33 लाख सांगितली गेली आहे. मात्र, 2020 च्या अंदाजानुसार पाहिला गेल्यास मृतांचा आकडा अत्यंत कमी दाखवला जात आहे.
आरोग्य संघटनेचे प्रमुख Tedros Adhanom म्हणाले, की जेव्हापर्यंत जगभरात लसीकरण मोहिमेत असमानता दिसेल, तोपर्यंत मृतांचा आकडा वाढतच जाईल. ते म्हणाले, की यासाठी सर्व देशांना लशी पोहोचणं गरजेचं आहे.