ग्राहकांच्या दबावामुळे ICICI बँकेने किमान शिल्लक रकमेचा निर्णय बदलला, नवीन नियम काय?

ICICI Bank | देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांसाठी किमान मासिक शिल्लक रकमेसंदर्भातील आपला निर्णय बदलला आहे. बँकेने 1 ऑगस्टपासून उघडल्या जाणाऱ्या खात्यांसाठी ही रक्कम 50 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ग्राहकांकडून आलेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे बँकेने हा निर्णय मागे घेतला.
आता नवीन नियमांनुसार, मेट्रो आणि शहरी भागातील खातेदारांना त्यांच्या खात्यात 50 हजार रुपयांऐवजी किमान 15 हजार रुपये ठेवावे लागतील. निम-शहरी भागातील खातेदारांसाठी ही मर्यादा 7,500 रुपये, तर ग्रामीण भागातील खातेदारांसाठी ती 2,500 रुपये करण्यात आली आहे.
हेही वाचा : स्वातंत्र्य म्हटल्यावर तुम्ही बंदी कशी आणता? राज ठाकरेंचा सरकारला सवाल
बँकेने निर्णय बदलला असला तरी ग्रामीण खातेदार वगळता मेट्रो आणि निम-शहरी भागातील खातेदारांना किमान मासिक सरासरी शिल्लक रक्कम म्हणून 1 ऑगस्टपूर्वीच्या नियमाच्या तुलनेत अधिक रक्कम ठेवावी लागेल. आयसीआयसीआय बँकेनं काही तासांमध्येच किमान मासिक सरासरी शुल्कासंदर्भातील निर्णय ग्राहकांकडून आलेल्या तीव्र आक्षेप आणि असंतोषाच्या प्रतिक्रियांनंतर 50 हजारांचा निर्णय मागं घेण्यात आला आहे.
दरम्यान सॅलरी अकाऊंट, पेन्शनर्स, प्रधानमंत्री जनधन योजना खाते किंवा बेसिक बचत खात्यांवर या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांच्या तीव्र प्रतिक्रियांमुळे बँकेला आपला मूळ निर्णय बदलाव लागला. बँकेने म्हटले आहे की ग्राहकांच्या मौल्यवान फीडबॅकनंतर आम्ही नियमांमध्ये बदल करत आहोत.





