शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी मुंबई पोलिसांची मदत; ५० अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
![Helping Mumbai Police to control traffic congestion in the city; Special training to 50 officers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/navi-mumbai-traffice-780x470.jpg)
नाशिक: शहर परिसरातील वाहतूक कोंडी प्रशासनासह नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने यावर उपायासाठी नाशिक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीने वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे काही महिन्यांमध्ये शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यात येईल, असा दावा पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी केला आहे.
शहरात अपघात झाला की अपघातप्रवण क्षेत्र, अतिक्रमण, गतिरोधकांची उणीव यासह वेगवेगळ्या बाबींवर चर्चा होऊ लागते. दुसरीकडे, शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि त्याच वेगात वाढणारी वाहतूक कोंडी प्रशासनासह सर्वांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. मुंबई नाका, द्वारका परिसर, इंदिरा नगर बोगदा, सिटी सेंटर परिसर, एबीबी सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. कंपनी, कार्यालयीन कामाच्या वेळी ही वाहतूक कोंडी होण्यास सुरूवात होते. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. कोंडीमुळे कधी कधी अपघातही घडतात. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई पोलिसांशी या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी- कर्मचारी यांच्याशी चर्चा करुन पुढील काही दिवसात नाशिक शहर पोलीस दलातील ५० अधिकारी-कर्मचारी हे मुंबई येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. दिवाळीमुळे प्रशिक्षणासाठी वेळ न मिळाल्याने प्रशिक्षण लांबले. मात्र पुढील १५ ते २० दिवसात मुंबई पध्दतीनुसार हे प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी दिली.
शहरातील काही अपघातप्रवण क्षेत्रासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. याशिवाय विभागीय आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याशी बैठका झाल्या आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांनी याबाबत आढावा बैठक घेतली आहे. महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली असून एका सामाजिक संस्थेच्या मदतीने या भागांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये अपघात प्रवण क्षेत्रात वाहतूक नियंत्रण यंत्रणा, उड्डाणपूल किंवा अन्य काही उपायांविषयी सूचना मागविण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी कामही सुरू झाले असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले.