श्रीनगरमध्ये सुरक्षा जवानांना मोठं यश; लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर ठार
![Great success for security personnel in Srinagar; Top commander of Lashkar-e-Toiba killed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Pakistani-terrorist-la.jpg)
नवी दिल्ली – संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देत असतानाच भारताच्या सीमेवर दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच आहेत. श्रीनगरच्या मलूरा पारींपोरा भागात कालपासून धूमश्चक्री सुरू होती. त्यात जवानांनी लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर नदीम अबरार याला कंठस्नान घातलं. त्याबरोबरच इतर दोन अतिरेक्यांनाही ठार मारण्यात यश आलं. मात्र या एन्काऊंटरमध्ये सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्यासह दोन जवान जखमी झाले आहेत.
जम्मू काश्मीरचे आयजीपी विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर बारामुल्ला सीमेवर झालेल्या अनेक हत्या आणि दशहतवादी कारवायांमध्ये अबरारचा सहभाग होता. आम्हाला काही दहशतवादी हायवेवर हल्ला करणार आहेत अशी माहिती आली होती. त्या पार्श्वभूमीवर हायवेवर जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने नाकेबंदी केली. पारींपोर नाक्यावर एक गाडी अडवली आणि त्यांना ओळख विचारली गेली. त्याच वेळेस गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या मास्क घातलेल्या व्यक्तीने स्वत:ची बॅग उघडण्याचा प्रयत्न केला आणि ग्रेनेड काढला. त्याच वेळेस नाक्यावरच्या टीमने त्या व्यक्तीला तात्काळ पकडलं आणि त्याच्यासह गाडीच्या ड्रायव्हरला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तिथे आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढला गेला तर तो लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अबरार होता. त्यानंतर त्याला जेकेपी, सीआरपीएफ आणि सैन्याच्या संयुक्त टीमने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि इंटरोगेशन सुरू केलं. त्याच चौकशीत त्याने सांगितलं की, मलुरातल्या एका घरात त्याने Ak-47 रायफल ठेवली आहे. अबरारच्याच माहितीवर सुरक्षा जवानांनी मलूरच्या त्या घराची, भागाची नाकाबंदी केली आणि अबरारलाही त्या घरात नेण्यात आलं. मात्र त्यावेळेस त्या घरात लपून बसलेल्या अबरारच्याच एका साथीदार दहशतवाद्याने जवानांवर गोळीबार सुरू केला. अबरारने मात्र सुरक्षा जवानांना याबाबत माहिती दिली नव्हती. त्यामुळे जवानांसोबत धोका झाला. मात्र जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबारास चोख प्रत्युत्तर दिलं. परंतु सुरुवातीच्या चकमकीत सीआरपीएफचे 3 जवान जखमी झाले. तर नंतर झालेल्या चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला. तसेच त्याचवेळी नदीम अबरारही ठार झाला. त्याचबरोबर घटनास्थळावरून दोन AK-47 रायफल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. अद्यापही त्या भागात शोधमोहीम सुरूच आहे.