TOP Newsताज्या घडामोडी

आजपासून ग्रामीण साहित्य संमेलन – परिसंवाद, व्याख्यान, कविसंमेलनाचा समावेश

नाशिक – इगतपुरी तालुका साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच नाशिक येथील मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था यांच्या वतीने पाच आणि सहा नोव्हेंबरला २३ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन पाथर्डी फाटा येथील धनलक्ष्मी बालविद्यामंदिर व प्राथमिक शाळेच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती संयोजक आणि मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांनी दिली.

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे हे या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष असून, लक्ष्मण महाडिक हे उद्घाटक मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर यांनी सांगितले. संमेलनात शनिवारी दुपारी एक वाजता ग्रंथदिंडी व त्यानंतर प्रकाश कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा होईल. या वेळी विनोद गोरवाडकर, संजय वाघ, दिलीप पवार प्रमुख पाहुणे असतील. गोरख बोडके स्वागत करतील. दुपारी चारला दुसऱ्या सत्रात वैजयंती सिन्नरकर यांचे ”संत साहित्यातील चिरंतन मूल्य” या विषयावर व्याख्यान तसेच साडेचारला अहमदनगर येथील कवयित्री ऋता ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. सायंकाळी सहाला तृतीय सत्रात मालुंजकर यांच्या ”संसार मातीचा” या काव्यसंग्रहाचे विवेक उगलमुगले यांच्या हस्ते प्रकाशन, तसेच ज्येष्ठ लेखक दत्तात्रेय झनकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गौरव सोहळा होईल.

रविवारी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला स्वागतगीत, साडेनऊला ”आनंदी ”जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर प्रा. राजेश्वर शेळके यांचे व्याख्यान तसेच सकाळी १० वाजता साहित्यातील विविध पुरस्कारांचे वाटप केले जाईल. प्राचार्य यशवंत पाटील (जीवनगौरव), सावळीराम तिदमे (सर्वतीर्थ), प्रकाश कोल्हे (ज्ञानदूत), सुभाष सबनीस (अक्षरदूत), राजेंद्र सोमवंशी (काव्यरत्न), गजश्री पाटील (ज्ञानसाधना), भगीरथ मराडे (सामाजिक कृतज्ञता), विनोद सोनवणे (कलारत्न), ज्योती केदार (समाजमित्र) आणि संजय वाघ (साहित्य सन्मान) यांचा गौरव केला जाणार आहे. यावेळी बदलते समाजजीवन” या विषयावर कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा तसेच दुपारी सव्वाबाराला संमेलनाध्यक्ष कांबळे यांचे मनोगत असे कार्यक्रम होतील. कथाकथन, दुपारी तीनला खुले कविसंमेलन आणि सायंकाळी पाचला ॲड. रतनकुमार इचम यांच्या अध्यक्षतेखाली समारोप सत्र होईल. ग्रंथमित्र बाळासाहेब पलटणे आभार मानतील. या दोन दिवसीय संमेलनास साहित्यप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मानवधन सामाजिक,शैक्षणिक संस्थेतर्फे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button