आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुगलचे खास डूडल, महिलांचा सन्मान
![Google's special doodle for International Women's Day, honoring women](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-08-at-14.09.49.jpeg)
नवी दिल्ली | आज म्हणजेच 8 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत. त्याचबरोबर या खास प्रसंगी गुगलने खास डूडल बनवून जगभरातील महिलांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक यशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, तसेच स्त्रियांबद्दल आदर, प्रशंसा आणि प्रेम दर्शवितो. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022च्या निमित्ताने गुगलने एक क्रिएटिव्ह डूडल बनवले आहे. हे डूडल महिलांचा संयम, त्याग आणि त्यांचा आत्मविश्वास दाखवत आहे. गुगलच्या होमपेजवर सुंदर अशा ऍनिमेटेड स्लाइड शोसह डूडल खूप आकर्षक दिसत आहे. या डूडलमध्ये विविध संस्कृतीतील महिलांच्या जीवनाचे चित्रण करण्यात आले आहे. घरातील कामाबरोबरच एक स्त्री बाहेरच्या जगात स्वतःचे नाव कसे कमवते आहे हे यात दाखवण्यात आले आहे. आज आपण पाहतो, प्रत्येक क्षेत्रात महिलांसमोर अनेक मोठी आव्हाने उभी आहेत, या आव्हानांचा त्या उत्कृष्टप्रकारे सामना करत आहेत.