खुशखबर… आज तुमच्या पीएफ खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे
![Central employees' Diwali dearness allowance will increase by 3%](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/cash_20180365845.jpg)
मुंबई – अनेक दिवसांपासून नोकरदारांचे पीएफवरील राहिलेले व्याजाचे पैसे आज अखेर त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. व्याजाचे हे पैसे ऑगस्ट महिन्यात नोकरदारांच्या खात्यात जमा होतील, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आज म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी हे पैसे नोकरदारांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय श्रम मंत्रालयाकडून भविष्य निर्वाह निधीवर (PF) वाढीव व्याजासाठी नुकतीच मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे 2020-21 आर्थिक वर्षासाठी पीएफच्या रक्कमेवर 8.5 टक्के व्याज मिळणार आहे. वाढलेल्या व्याजासह पीएफची रक्कम आता नोकरदारांच्या खात्यात जमा होईल.
सध्या कोरोना संकटामुळे अनेकांची आर्थिक अवस्था बिकट झाल्याने भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने कर्मचाऱ्यांना एक नवी सुविधा देऊ केली आहे. त्यामुळे तुम्ही आता आजारपणाच्यावेळी गरज लागल्यास PF खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकता. विशेष म्हणजे यासाठी रुग्णालयाचे बिलही सादर करण्याची गरज नाही. केवळ एक विनंतीचा अर्ज सादर करून तुम्ही हे पैसे मिळवू शकता. या अर्जात आजार आणि रुग्णालयाची संपूर्ण माहिती नमूद करावी लागेल.
पीएफ खातेधारक स्वत:साठी आणि कुटुंबातील व्यक्तींसाठी पैसे घेऊ शकतो. यापूर्वी रुग्णालयाचे बिल दाखवल्यानंतरच पीएफ खात्यामधून आगाऊ रक्कम काढता येत होती. मात्र, आता केवळ एक अर्ज दिल्यानंतर काही तासांमध्ये तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. या सुविधेमुळे पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.