केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्ता ३ टक्के वाढणार
![Central employees' Diwali dearness allowance will increase by 3%](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/cash_20180365845.jpg)
नवी दिल्ली – केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ टक्क्यांवरून ३१ टक्के होणार आहे. गेल्या जुलैमध्ये केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून तो २८ टक्के केला होता. कोरोनाच्या संकटामुळे मे २०२० पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता स्थगित केला होता. मात्र आता तो पुन्हा ३ टक्के वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दर ६ महिन्यांनी सुधारित महागाई भत्ता लागू होतो. जानेवारी आणि जुलैमध्ये त्यांना हा सुधारित महागाई भत्ता दिला जातो. कोरोनाच्या संकटामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्तावाढ रोखण्यात आली होती. मात्र जुलै २०२१ पासून ही महागाई भत्तावाढ सरकारने दिली आहे. त्यानुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता दिला जातो. मात्र आता त्यात आणखी ३ टक्के वाढ करून तो ३१ टक्के केला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यामुळे त्यांचा पीएफ आणि ग्रॅच्युईटीतही वाढ होणार आहे. महागाई भत्ता वाढीचा यावर परिणाम होतो. याशिवाय प्रवास भत्ता आणि शहरी भत्ता यातही वाढ होणार आहे.