मारेकऱ्याला जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा द्या ; पल्लवीच्या वडिलांची उच्च न्यायालयात फेरविचार याचिका
![Give death sentence to murderer instead of life imprisonment; Pallavi's father's review petition in the High Court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/collage-0988.jpg)
मुंबई : वकील पल्लवी पूरकायस्थ (२५) हिच्या २०१२ मध्ये झालेल्या हत्या प्रकरणातील दोषसिद्ध आरोपी सज्जाद मुघल याला जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी या मागणीसाठी पल्लवीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
सत्र न्यायालयाने जुलै २०१४ मध्ये पुरकायस्थ राहत असलेल्या इमारतीतील सुरक्षा रक्षक सज्जादला खून, विनयभंग आणि घरात घुसल्याच्या आरोपाप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हे प्रकरण ‘‘दुर्मिळातील दुर्मीळ’’ श्रेणीत मोडत नसल्याचे नमूद करून सज्जादला फाशीची शिक्षा सुनावण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने त्या वेळी फेटाळली होती. राज्य सरकारने २०१५ मध्ये सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करून सज्जादला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.
पल्लवीचे वडील अतनु पूरकायस्थ यांनी शिक्षेच्या पुनर्विचारासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सत्र न्यायालयाने या प्रकरणी सज्जादला सुनावलेली शिक्षा ही त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता योग्य नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. शिक्षेबाबतची फेरविचार याचिका करण्यासाठी झालेला विलंब माफ करण्याचीही विनंती अतनु पूरकायस्थ यांनी न्यायालयाकडे केली होती. ती न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने मान्य केली. पूरकायस्थ यांच्या याचिकेवर २२ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. पल्लवी हिचा ९ ऑगस्ट २०१२ रोजी वडाळा येथील हिमालयन हाइट्स बी विंगमधील १६व्या मजल्यावरील तिच्या घरात गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या सज्जादने आधी तिच्या घरातील वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे तिने त्याच्यासह अन्य एका सुरक्षा रक्षकाला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी संपर्क साधला. वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर सज्जादने या संधीचा फायदा घेतला आणि तिच्या घराची चावी चोरली. त्यानंतर त्याच रात्री त्याने तिच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला व नंतर तिचा खून केल्याचा आरोप होता.