मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अक्षय शिंदे या २४ वर्षीय तरुणाला अटक
कामावर ठेवताना कर्मचाऱ्याची तपासणी केली नाही, शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा नाही
![Girls, sexual, exploitation, Akshay Shinde, youth, arrest, school, CCTV, camera,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/amit-shinde-780x470.jpg)
बदलापूर : बदलापूर लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अक्षय शिंदे या २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अवघ्या चार वर्षीय मुलींवर या नराधमाने अत्याचार केल्याने त्याच्यावर सर्वत्र टीका केली जातेय. एवढंच नव्हे तर या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यास उशीर झाल्यानेही बदलापुरात काल (२० ऑगस्ट) आंदोलन पेटले होते. परिणामी लोकल सेवा जवळपास १० तास खंडित झाली होती.
१३ ऑगस्ट रोजी या नराधमाने सकाळी ९ ते दुपारी १२ च्या दरम्यान बदलापुरातील आदर्श विद्यामंदिर या शाळेतील दोन लहान मुलींबरोबर दृष्कृत्य केलं. परिणामी त्यांना गुप्तांगात वेदना होऊ लागल्या. या मुलींनी यासंदर्भात त्यांच्या पालकांना कळवलं. पालकांनी तत्काळ वैद्यकीय तपासणी केल्याने हा प्रकार उजेडात आला. परंतु, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरही या प्रकरणी कारवाई करण्यास पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचा दावा करण्यात येतोय. १३ ऑगस्ट घडलेल्या घटनेबाबत १६ ऑगस्टच्या रात्री गुन्हा नोंदवण्यात आला. तर १७ ऑगस्ट रोजी अक्षय शिंदे या आरोपीला अटक करण्यात आली. दरम्यान, आज सकाळी आरोपीला कडक पोलीस बंदोबस्तात कल्याण जिल्ह्यातील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
२४ वर्षीय अक्षय शिंदे हा सफाई कामगार असून तो १ ऑगस्ट रोजी एका सफाई कंपनीमार्फत शाळेत कंत्राटावर नोकरीला लागला होता. नव्यानेच नोकरीला लागलेल्या अक्षयला विद्यार्थिंनीना शौचालयास घेऊन जाण्याचीही जबाबदारी देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी त्याने हा डाव साधत चिमुकल्यांवर अत्याचार केला.
कामावर ठेवताना कर्मचाऱ्याची तपासणी केली नाही
“मी शाळेला भेट दिली, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत. तसंच सखी सावित्री समितीही नाही. पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांना महिला प्रसाधनगृहात जाऊ दिलं जातं आहे. जो आरोपी आहे तो काँट्रॅक्टवर लागला होता. मात्र त्याची पार्श्वभूमी काय हे कुणीही जाणून घेतलं नाही. त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे का ते पाहिलं गेलं नाही”, असं महाराष्ट्र राज्य बालहक्क समितीच्या अध्यक्षा सुसीबेन शाह यांनी सांगितले.
बदलापुरातील आंदोलन पूर्वनियोजित
“छापील फलक, व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेज आणि इतर काही संकेतावरून हे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे समजते. लैंगिक अत्याचार प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर सोमवारीच हे आंदोलन करण्याचा काही राजकीय पक्षांचा प्रयत्न होता. मात्र सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे आंदोलन मंगळावारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आंदोलकांकडे जे छापील फलक होते, तसेच इतर काही वस्तू आणल्या गेल्या होत्या. त्यावरून व्यवस्थित नियोजन करून हे आंदोलन केले गेले, हे दिसून येते. तसेच लाडकी बहीण योजनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यावरून हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे सांगितले जाते.
रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सिसवे म्हणाले की, रेल्वे सेवा रोखून धरणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच २६ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीसीटीव्ही चित्रण तपासल्यानंतर आणखी काही लोकांना अटक करण्यात येईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल.