अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पॉर्नस्टारला पैसे दिल्या प्रकरणी अटक
ट्रम्प जामीनासाठी कोर्टात अर्ज सादर करण्याची शक्यता
![Former US President Donald Trump arrested for paying porn star](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Donald-Trump-780x470.jpg)
Donald Trump Arrested : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पॉर्नस्टारला पैसे दिल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या असलेल्या लैंगिक संबंधाबाबत स्टॉर्मी डॅनियल्स बोलू नये यासाठी तिला पैसे देण्यात आले होते.
मॅनहॅटन न्यायालयात सुनावणीसाठी गेले असता, ट्रम्प यांनी शरणागती पत्करली आहे. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार दुपारी दीडच्या सुमारास ते शहरातील ‘ट्रम्प टॉवर’ या आपल्या निवासस्थानातून न्यायालयात दाखल झाले. त्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा त्यांना अटक झाली असून गुन्हेगारी प्रकरणात अशी कारवाई होणारे ते पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
डॅनियल्स हिला ट्रम्प यांच्या माजी वकील मायकेल कोहेन यांनी ही रक्कम दिली होती. त्याबदल्यात कोहेंन यांना ४३ दशलक्ष डॉलर देण्यात आले होते. न्यूयॉर्कची ग्रँड ज्युरी स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला २०१६ च्या $१३ दशलक्ष पेमेंटमध्ये ट्रम्प यांचा सहभागाची चौकशी करत आहे. आज ट्रम्प जामीनासाठी कोर्टात अर्ज सादर करण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्या विरोधातील आरोप काय आहेत?
रॉयटर्स (Reuters) या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, मॅनहॅटन जिल्ह्याचे वकील अलविन ब्रॅग यांनी न्यू यॉर्क ग्रँड ज्युरी न्यायालयात पुरावा सादर करताना निदर्शनास आणून दिले की, ट्रम्प यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये, यासाठी स्टॉर्मी डॅनियलला १ लाख ३० हजार डॉलर एवढी रक्कम देण्यात आली. स्टॉर्मीचे खरे नाव स्टेफनी क्लिफॉर्ड आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करत असताना ही रक्कम देण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.