नाशिक जिल्ह्यात दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश
![Forest department succeeded in imprisoning two leopards in Nashik district](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/New-Project-2022-11-20T174742.454-780x470.jpg)
नाशिक | जिल्ह्यात दोन ठिकाणी बिबट्यांना सापळ्यात अडकविण्यात यश आले आहे. वन विभागाच्या वतीने बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. सिन्नर तालुक्यातील आशापूर, टेंभुरवाडी परिसरात वाळिबा पाटोळे यांच्या जुन्या कौलारू गोठ्यात एक बिबट्या आजारी अवस्थेत असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला परिसरातील नागरीकांनी दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आणि इको प्राणीमित्र संस्थेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले.
आजारी बिबट्या अंदाजे अडीच ते तीन वर्षाचा असून त्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यत आले. वनविभागाकडून त्याला माळेगाव येथील वनउद्यानात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पाथर्डी गाव परिसरातही एक बिबट्या जाळ्यात अडकला. नवले यांच्या मळ्यात बिबट्या आला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वन विभागाचे पथक दाखल होताच बिबट्याने पथकाला गुंगारा देण्यास सुरूवात केली. या परिसरात पिंजरा लावण्यात आला. बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद होताच वनविभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेत गंगापूर येथील रोपवाटिकेत त्याला नेले.