‘माझ्या मित्रावर झालेल्या हल्ल्याबद्दल अत्यंत चिंतित…’ PM मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा केला निषेध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-85-1-780x470.jpg)
Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक रॅलीदरम्यान गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबाराच्या घटनेत गोळी ट्रम्प यांच्या कानाला स्पर्श करून गेली आणि त्यांच्या कानातून रक्त वाहत असल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे.
‘माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. आमचे विचार आणि प्रार्थना मृतांचे कुटुंब, जखमी आणि अमेरिकन लोकांसोबत आहेत.’
हेही वाचा – भाजप अन् काँग्रेसमध्ये वेगळेपण काय? आपण तेच काम केले तर… भाजप नेत्यांचे नितीन गडकरी यांनी पुन्हा टोचले कान
दरम्यान, या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसच्या एजंटांनी हल्लेखोराला तत्काळ ठार केले.
ट्रम्प यांच्या रॅलीचा जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये ते स्टेजवरून रॅलीला संबोधित करत असताना गोळीबाराचा आवाज येत असल्याचे दिसत आहे. गोळ्या झाडल्यानंतर ट्रम्प कानावर हात ठेवून व्यासपीठाखाली वाकले आणि त्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरले.
यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या गर्दीत आरडाओरडा होत असून तेथे उपस्थित अनेकजण आपापल्या जागेवर आडवे होतांना व्हिडिओत दिसत आहे. सीक्रेट सर्व्हिस कमांडो कारवाईत येतात आणि ट्रम्पला घेरतात. यानंतर ट्रम्प तिथून बाहेर आले तेव्हा ते हवेत मुठ फिरवत काहीतरी बोलतांना दिसले. यावेळी ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर आणि कानाखाली रक्त दिसत होते. ताबडतोब गुप्तहेरांनी ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवले, कारमध्ये बसवले आणि तेथून दूर नेले.