माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; दिल्लीतील धक्कादायक प्रकार
![Ex-Union Minister's wife stabbed to death; Shocking type in Delhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Kitty-Kumaramangalam.jpg)
मुंबई |
भारताची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पी. आर. कुमारमंगलम यांची पत्नी किट्टी कुमारमंगलम यांची राहत्या घरामध्ये हत्या करण्यात आलीय. दक्षिण पश्चिम दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री ही हत्या करण्यात आली आहे. किट्टी कुमारमंगलम या दिल्लीतील वसंत विहार परिसरामध्ये राहत होत्या. पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये एका संक्षयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. इतर दोन जणांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. मात्र किट्टी यांची हत्या का करण्यात आली यासंदर्भातील माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.
किट्टी कुमारमंगलम यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरणीने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास इस्त्रीवाला घरी आला होता. त्यानंतर दोन अन्य व्यक्तीही घरी आल्याचं माहिती या महिलेनी दिली. त्यानंतर त्या दोन अनोळखी व्यक्तींनी माझे हात पाय बांधले आणि किट्टी कुमारमंगलम यांची हत्या केली. पोलिसांनी इस्त्रीवाल्याला अटक केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार तोंडावर उशी दाबून किट्टी यांची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक अंदाजानुसार सांगण्यात येत आहे. या हत्येची माहिती पोलिसांना ११ वाजण्याच्या सुमारस देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केली. किट्टी कुमारमंगलम या सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील होत्या. त्यांचे पती पी. आर. कुमारमंगलम पहिल्यांदा १९८४ साली पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी संसदीय मंत्री आणि कायदा, सुव्यवस्था कंपनी अफेर्स मंत्रालयाचं काम १९९१ ते ९२ दरम्यान पाहिलं. ते १९९२ ते ९३ साली संसदीय कामकाज मंत्री होते. १९९८ साली ते देशाचे ऊर्जामंत्री होते.
- दुहेरी हत्याकांडाचाही तपास सुरु
दिल्लीमध्येच हत्येचं आणखीन एक प्रकरण समोर आलं आहे. दक्षिण पश्चिम दिल्लीमध्ये एक दुहेरी हत्याकांड घडलं आहे. हवाईदलामध्ये अकाऊंटंटच्या ५२ वर्षीय पत्नीची आणि २७ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. पालम हवाई तळावर तैनात असणाऱ्या कृष्ण स्वरुप सुधीर यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींचा हत्या करण्यात आली आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव गौरव असं आहे. सुधीर यांनीच पोलिसांना हल्ल्याची माहिती दिली. गौरवने या हत्या का केल्या याचा पोलीस सध्या तपास करत आहेत. या प्रकरणांमुळे दक्षिण पश्चिम दिल्लीमधील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असल्याचं चित्र दिसत आहे.