TOP Newsताज्या घडामोडी

चौफुलीजवळील अतिक्रमण, गतिरोधक तयार करण्याकडे दुर्लक्ष

नाशिक – पंचवटीत औरंगाबाद रस्त्यावरील कैलासनगर चौफुलीवर एक-दोन अपघात ठरलेले आहेत. वारंवार गतिरोधकाची मागणी करूनही आजवर कुणी दखल घेतलेली नाही. महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने परस्परांकडे बोट दाखवत वेळ मारून नेली. यापूर्वीच गतिरोधक बसविले असले तर आज १२ जणांना प्राण गमाविण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत स्थानिकांनी प्रशासकीय यंत्रणेवर आपला संताप व्यक्त केला. अतिशय वर्दळीच्या चौकात प्रखर प्रकाशझोताचा दिवाही नाही. सभोवताली अतिक्रमण असल्याने भरधाव येणाऱ्या वाहनांचा प्रत्यक्ष चौकात येईपर्यंत अंदाज येत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या अपघाताने कुंभमेळ्यात निर्मिलेल्या वळण रस्त्यांनी चौफुल्यांवर निर्माण झालेल्या समस्या प्रकर्षाने पुढे आल्या आहेत. शनिवारी नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर जिथे अपघात झाला ती कैलासनगर चौफुली म्हणून ओळखली जाते. नाशिक-औरंगाबाद महामार्गास चौकात वळण रस्ता तिला छेदतो. गुजरात, सूरतसह मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळ्याकडून येणाऱ्या वाहनांना पुणे महामार्गाला जाण्यासाठीचा हा वळण रस्ता आहे. चौफुलीवरून तो उपनगर, रामदास स्वामी मठ, गांधीनगरकडे जातो. त्यावर दिवसभर अवजड वाहनांची मोठी गर्दी असते. याच मार्गावर काही अंतरावर तीन शाळा आहेत. दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली. पण, रात्री तिचे कुणी पालन करीत नाही. अतिक्रमणांनी शेजारील रस्त्यावरून वाहन येते की नाही, हे देखील चौकात आल्याशिवाय कळत नसल्याचे दिसून येते. वळण रस्त्यावरून भरधाव वाहने जात असल्याने पायी चालणे वा तो ओलांडण्यास नागरिकांना भीती वाटते, अशी स्थिती आहे. त्यामुळे गतिरोधकाची नितांत गरज असून तो असता तर हा अपघात झाला नसता, असे माजी नगरसेविका सुनिता निमसे यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी याच चौफुलीलगत वैद्यकीय महाविद्यालयाची बस उलटली होती. सुदैवाने त्यात जिवितहानी झाली नाही. आठ ते दहा दिवसात एक-दोन अपघात होतात, गतिरोधक बसविण्यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला. आंदोलने झाली. मात्र, मनपा आणि बांधकाम विभागाने केवळ टोलवाटोलवी केल्याचे गणेश हासे, मधुकर जेजुरकर यांनी सांगितले. चौफुलीवर रात्रीच्या वेळी वाहने दृष्टीपथास पडतील, असा प्रखर दिवा नाही. वारंवार अपघात होतात. स्थानिकांना मदतीला धावावे लागते. वाहतूक पोलीस लक्ष देत नाही. वारंवार अपघात होऊनही आजवर कुणी दखल घेतली नाही. आज इतका भीषण अपघात झाल्यानंतर यंत्रणेला जाग आल्याची संतप्त भावना स्थानिकांनी व्यक्त केली. याआधीच गतिरोधक बसविले असते तर वाहने चौकातून संथपणे मार्गस्थ झाली असती. हा अपघातही झाला नसता, असे शरद नाठे यांनी म्हटले आहे. चौकालगत एका मोठ्या राजकीय नेत्याचे हॉटेल आहे. दुसऱ्या बाजुला वळण रस्त्यावर अनेक टपऱ्या आहेत. ही अतिक्रमणेही चौकातून वळण घेताना व मार्गस्थ होताना अडसर ठरत असल्याचे दिसून येते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button